सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्याचा विकास करुया पालकमंत्री हसन मुश्रीफ...पोलीस कवायत मैदान येथे प्रजासत्ताक दिनाचा ७५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्याचा विकास करुया
   पालकमंत्री हसन मुश्रीफ

पोलीस कवायत मैदान येथे प्रजासत्ताक दिनाचा ७५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

वाशिम, दि. २६ जानेवारी (जिमाका) : आपला जिल्हा निति आयोगाने आकांक्षित जिल्हा म्हणून घोषित केला आहे. ही ओळख पुसण्यासाठी आपण प्रयत्न करु. वाशिम जिल्ह्याचा प्रगतीचा प्रवास आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे शक्य होईल. आपण सर्वांनी एकत्रितपणे काम केल्यास वाशिम जिल्हा महाराष्ट्रातील एक आदर्श जिल्हा बनू शकतो. आपल्या संविधानाच्या आदर्शांवर चालत, आपण विकासाची नवी शिखरे गाठूया. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करुया असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांनी केले.
       आज भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त वाशिम येथील पोलीस कवायत मैदान येथे पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस,जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे, उपवनसंरक्षक अभिजित वायकोस,अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे व अपर पोलीस अधिक्षक लता फड, उपविभागीय पोलिस अधिकारी नवदीप अग्रवाल यांच्यासह इतर मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
       श्री.मुश्रीफ म्हणाले, आरोग्य क्षेत्रात जिल्ह्याने लक्षणीय कामगिरी केली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ओपीडीची संख्या दीड पट वाढली असून, गरोदर माता आणि बालकांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. टीबी मुक्त भारत मोहिमेंतर्गत २४ हजार ७०० रुग्ण तपासण्यात आले असून, ६८५ रुग्णांवर यशस्वी उपचार सुरू आहे. याशिवाय वाशिम येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे, ज्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. आरोग्य सेवेत जिल्हा रूग्णालय मागील ४ महिन्यांपासून राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.
वाशिम जिल्ह्याने शेती क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. सन २४-२५ या हंगामासाठी १ लक्ष ३८ हजार १५ शेतकऱ्यांना १ हजार ६०० कोटी रुपयांचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. या उद्दिष्टाच्या अनुषंगाने, दोन्ही हंगामांमध्ये एकूण १ लक्ष २४ हजार ६६० शेतकऱ्यांना १ हजार २२७ कोटी रुपयांचे पीक कर्जवाटप करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी हा प्रयत्न महत्त्वाचा ठरला आहे. 
          पुढे बोलतांना पालकमंत्री म्हणाले ,कृषी रब्बी हंगामामध्ये कमी खर्चात अधिकचे उत्पन्न मिळून देणारे चियासीड पिक रब्बी-२०२४ मध्ये ९५० हेक्टर वर पेरणी झाली होती त्यामधून शेतकरी बांधवांना चांगले उत्पन्न मिळाल्याचे दिसून आले. चालू रब्बी हंगाम २०२५ मध्ये ३५०० हेक्टर क्षेत्रावर चियासीड ची पेरणी झालेली आहे आणि, रब्बी साठी उत्तम पिकाचा पर्याय निर्माण झालेला आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप २०२३-२४ मध्ये जिल्ह्यात एकुण ३ लक्ष ८ हजार ४०६ शेतकऱ्यांना रूपये १८४ कोटी पेक्षा जास्त विमा नुकसान भरपाई रक्कम वाटप करण्यात आलेली आहे. राज्यात खरीप हंगाम २०२३ पासून सर्वसमावेशक प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू करुन १ रुपयात शेतकऱ्यांना पिक विमा योजनेत सहभागी होता आले. त्यामुळे खरीप २०२४ मध्ये वाशिम जिल्हयातील १ लक्ष ९६ हजार ५०४ शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग घेतला असुन ३ लक्ष ५२ हजार ५३५ हेक्टर क्षेत्र नुकसानी पासून संरक्षित झाले आहे.
          जिल्हयात २०२४-२५ वर्षात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ७८५ हेक्टर क्षेत्रावर ८१२ लाभार्थ्यांना फळबाग लागवडीचा लाभ देण्यात आला. तसेच भाऊसाहेब फुंडकर योजनेअंतर्गत ५०० हेक्टर क्षेत्रावर २१० लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आला आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही मुख्यत: कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. ही बाब लक्षात घेता केंद्र शासनाने शेतकरी बांधवांकरीता अग्रिस्टॅक ही योजना १४ ऑक्टोबर २०२५ पासून राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांचे स्वत:चे शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आयडी तयार होणार आहे. हा फार्मर आयडी तयार झाल्यानंतर प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत पात्र सर्व लाभार्थी समाविष्ट करून घेण्यास सहाय्य मिळणार आहे. पिक कर्ज मिळविण्यासाठी किसान क्रेडीट कार्ड आणि शेतीच्या विकासासाठी इतर कर्ज उपलब्ध करून घेण्यास सुलभता येईल. पिक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापण अंतर्गत देय नुकसान भरपाईसाठी सर्वेक्षण करण्यात सुलभता येईल. किमान आधारभूत किमतीवर खरेदीमध्ये नोंदणीकरण ऑनलाईन पद्धतीने होऊ शकेल. शेतकऱ्यांना वेळेवर कृषी विषयक सल्ले विविध संस्थाकडून संपर्क करण्याच्या संधीमध्ये नाविन्यपूर्ण वाढ होणार आहे. जिल्ह्यात अग्रिस्टॅक योजना राबविण्यात येत असून आजपर्यंत ४ हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. शेतकरी बांधवांना मी आवाहन करतो की, त्यांनी तलाठी, कृषी सहायक, विकास अधिकारी यांचे मार्फत अथवा सीएससी केंद्रामार्फत नोंदणी करून शासनाच्या या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
       नुकतेच ऑपरेशन द्रोणागिरी या प्रकल्पांतर्गत देशातील पाच जिल्ह्यांपैकी वाशिम जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे कृषी क्षेत्रात नवतंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांना अधिक लाभ देता येईल. ऑपरेशन द्रोनागिरीमुळे पिक उत्पादनात वाढ होऊन कामाचा वेळ आणि खर्च वाचेल माती आणि पाण्याचे संवरक्षण होईल. पर्यावणाचे रक्षण होईल यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याची संधी आहे. शेतकऱ्यांना प्रशिक्षण अनुदान आणि तांत्रिक मदत मिळण्याची शक्यता आहे. या प्रकल्पातर्गत वाशिम जिल्ह्यातील कृषी वाहतुक व पायाभुत सुविधा आणि उपजिविका व कौशल्य विकासाकडे भर दिला जाईल. 
       भविष्यात सिंचन विहिरींच्या कामामुळे जमिनीतील पाण्याचा साठा कमी होईल त्यामुळे भुजलपातळी वाढविण्याचे अनुषंगाने मनरेगा योजनेंतर्गत अत्यंत प्रभावी उपचार ठरत असलेल्या "प्रती एक एकरवर, एक जलतारा" याप्रमाणे जिल्ह्यात वहितीखालील सरासरी क्षेत्रानुसार १० लक्ष जलताराची कामे होऊ शकतात सदर बाब लक्षात घेता जिल्ह्यात कृषी विभागांतर्गत मिशन मोडवर जलताराची कामे सुरु करण्याचे नियोजन केले आहे. सदर कामे झाल्यास भुजल पातळीत वाढ होईल. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक शेत सिंचीत होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्नात भरीव वाढ होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे मनरेगा ही ग्रामीण भागाचा विकास घडवुन आणण्यास संजीवनी ठरत आहे व ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.   
      पालकमंत्र्यांनी राष्ट्रध्वजारोहणानंतर परेडचे निरीक्षण केले. वाशिम पोलीस दलाचे पुरुष व महिला पथक, होमगार्ड पुरुष व महिला दल, बाकलीवाल विद्यालयाचे राष्ट्रीय छात्र सेनेचे पथक, सुपखेला येथील यशवंतराव चव्हाण सैनिकी शाळेचे विद्यार्थी, नवोदय विद्यालयाचे स्काऊट पथक, सुरकंडी येथील मुलींचे निवासी शाळेचे पथक, महात्मा गांधी नगर परिषद शाळेचे पथक, पोलीस बँण्ड पथक, शिघ्र कृती दल, पोलीस श्वान पथक, पोलीस बॉम्ब शोधक पथक, पोलीस मोबाईल फॉरेन्सीक इनव्हेस्टीगेशन व्हॅन, पोलीस वॉटर कॅनॉन, शासकीय रुग्णालयाची अत्याधुनिक रुग्णवाहिका व नगरपरिषदेचे अग्निशमन दलाचे वाहन आदी परेडमध्ये सहभागी झाले होते. यावेळी विविध पथकांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
          पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते वीर पत्नी शांताबाई यशवंत सरकटे व पार्वतीबाई दगडू लहाने, वीरमाता मंदाताई गोरे, वीरपीता तानाजी गोरे व वीर पत्नी वैशाली गोरे,वीरपत्नी मीराबाई नागुलकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. विविध कार्यालयाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
          कार्यक्रमाचे संचालन राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालयाचे प्रा. मोहन शिरसाट यांनी केले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार बांधव, नागरिक व विविध शाळेचे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यानंतर, विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाच्या अखेरीस, उपस्थित मान्यवरांनी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली.
*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश