पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून 'कोरोना' प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा दैनंदिन आढावा



·        'कोरोना'वर मात करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १ कोटी रुपये
·        लॉकडाऊन'च्या काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यावर लक्ष
वाशिम, दि. ०३ : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून नियमितपणे दैनंदिन आढावा घेतला जात आहे. तसेच लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहील, तसेच नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
राज्य शासनाच्या सूचनेनुसार कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यास सुरुवात झाल्यापासून पालकमंत्री श्री. देसाई हे 'कोरोना' प्रतिबंधासाठी जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा दैनंदिन आढावा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्याकडून घेत आहेत. २२ मार्च रोजी झालेल्या जनता कर्फ्युनंतर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. त्यानंतर केंद्र सरकारने १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊनचे उल्लंघन होवू नये, तसेच 'कोरोना'च्या प्रतिबंधासाठी झटणाऱ्या प्रशासनावर आपल्या दौऱ्यामुळे अधिकचा ताण येऊ नये, यासाठी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात येणे टाळले असले तरी जिल्हाधिकारी श्री. मोडक यांच्याकडून दूरध्वनीद्वारे दैनंदिन आढावा घेत जिल्ह्यातील प्रत्येक घडामोडींवर ते लक्ष ठेवून आहेत.
औषधे, सामग्री खरेदीसाठी आरोग्य विभागाला १ कोटी रुपये निधी
‘कोरोना’ संसर्ग झालेल्या व्यक्तींवर उपचारासाठी लागणारी औषधे, सामग्रीचा पालकमंत्री श्री. देसाई यांनी आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी तातडीने निर्णय घेत जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आयसोलेशन वार्ड, क्वारंटाईन वार्ड सज्ज ठेवण्यासाठी आणि उपचारासाठी आवश्यक औषधे, सामग्री खरेदीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १ कोटी रुपये इतका भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच आवश्यकता पडल्यास सन २०२०-२१ च्या आराखड्यातुन निधी उपलब्ध करून देण्याचा सूचना केल्या आहेत.
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अखंडित ठेवण्याच्या सूचना
लॉकडाऊन काळात जिल्ह्यात किराणा, धान्य, दूध, भाजीपाला यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा व औषधांचा पुरवठा सुरळीत रहावा, या वस्तू मिळविण्यासाठी नागरिकांना अडचणी येऊ नयेत, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिल्या आहेत. तसेच बाहेर जिल्ह्यात, राज्यात अडकलेल्या नागरिकांना मदत मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीचा त्यांनी आढावा घेतला आहे.
*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे