कारखेड्याच्या पखमोडे दांपत्याने केला लॉकडाऊनचा सदुपयोग
·
‘लॉकडाऊन’मध्ये
केलं ‘ड्रील डाऊन’
·
२१
दिवसात खोदली २५ फुट खोल विहीर
वाशिम
जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील कारखेडा हे सुमारे साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव.
मानोरा-दिग्रस रोडवरील विठोली येथून पूर्वेकडे ३ किलोमीटर अंतरावर वसलेलं हे गाव
सध्या चर्चेत आलं आहे ते येथील पुष्पा व गजानन पखमोडे दांपत्याने केलेल्या एका
अनोख्या कामगिरीमुळे. वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुका हा तसा दुष्काळी तालुका
म्हणून ओळखला जातो. पाणीटंचाईची समस्या ही प्रत्येक उन्हाळ्यात प्रखरतेने जाणवते. त्यामुळे
पाण्याचे मोल इथं सर्वांनाच समजते. पुष्पा आणि गजानन यांनी सुद्धा हे मोल लक्षात
घेवून पाण्याच्या समस्येवर मात करणारी एक अनोखी व इतरांना आदर्शवत कामगारी करून
दाखविली आहे. ‘लॉकडाऊन’च्या २१ दिवसांत या पती-पत्नीने स्वतः खोदकाम करून अंगणात
२५ फुट विहीर खोदण्याची कामगिरी करून दाखवली आहे. ‘लाथ मारील तिथं पाणी काढील’ या आत्मविश्वासाने
आणि जिद्दीने त्यांनी केलेले काम सर्वांसमोर आदर्श निर्माण करणारे आणि प्रेरणादायी
तर आहेच पण वेळेचा सदुपयोग कसा करावा, हे सुद्धा शिकविणारे आहे.
गजानन पखमोडे यांचे सहा जणांचे कुटुंब कारखेडा
गावात राहते. त्यांचे शिक्षण १० वी नापास इतकच. गावातच या कुटुंबाची अडीच एकर शेती
आहे. सिंचनासाठी विहीर आहे, पण उन्हाळ्यात या विहिरीला पाणी राहत नसल्याने
सोयाबीन, तूर ही दोनच पिके घेता येतात. शेतीतून फारसं उत्पन्न मिळत नसल्याने गजानन
रोजंदारीवरील गवंडीकाम व इमारतींना रंगरंगोटी करण्याचे काम करून कुटुंबाच्या
उत्पन्नात भर टाकतात. जिल्ह्यात तसेच शेजारच्या जिल्ह्यातही ते गवंडी कामावर
जातात. मात्र, सर्वत्र कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू लागल्यानंतर राज्यात या
विषाणूच्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
यांनी २३ मार्चपासून ते ३१ मार्चपर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय
घेतला. त्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची
घोषणा केली. त्यामुळे इतर सर्व उद्योग, व्यवसायांप्रमाणे बांधकामे सुद्धा बंद
झाली. त्यामुळे या काळात करायचं काय, असा प्रश्न गवंडी काम करणाऱ्या गजानन
यांच्यासमोर उभा ठाकला. यावर चर्चा
झाल्यानंतर गुडीपाडव्याच्या पूर्वसंध्येला या दांपत्याने ठरवलं की आता १४ एप्रिलपर्यंत
बसून राहण्यापेक्षा घराच्या अंगणातच छोटीशी विहीर खोदायची आणि उन्हाळ्यातील
पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवायची.
गुडीपाडव्याच्या
मुहूर्तावर पखमोडे दांपत्याने घराच्या अंगणातच विहीर खोदण्याचा श्रीगणेशा केला.
सुमारे साडेपाच फुट घेर असलेली गोलाकार विहीर खोदण्याच्या कामाला पुष्पा आणि गणेश
यांनी पहिल्या दिवसापासूनच स्वतःला जुंपून घेतले. सात फुट खोल खोदाल्यानंतर
विहिरीचा घेर साडेचार फुट करण्यात आला. रोज नास्ता करून सकाळी ८ वाजता खोदकामाल
सुरुवात व्हायची, दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत विहीर खोदण्याचे काम चालायचे.
दुपारच्या जेवानंतर थोडी विश्रांती घेवून पुन्हा सूर्य मावळतीला जाईपर्यंत हे काम
सुरु राहायचे. पुष्पा आणि गजानन या पती-पत्नीची ही दिनचर्या २१ दिवस अशीच सुरु
होती. ५ फुटापर्यंत मातीचा थर, त्यानंतर ३ फुट कच्चा मुरूम आणी एक फुटाचा कठीण खडक
व पुन्हा २४ फुटापर्यंत कच्च्या मुरुमाचा थर फोडून या दांपत्याने २१ दिवसांत २५
फुट खोल छोटी विहीर खोदली. आणखी १० फुट फोडून त्यांना ती ३५ फुट करायची आहे. २०
फुटावरच पाण्याचा झरा सापडला असल्याने पुष्पा आणि गजाननचा आनंद गगनात मावेनासा
झाला. आपले कष्ट सार्थकी लागले असून आता उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याची चिंता
मिटल्याचे समाधान या दांपत्याला आहे.
सुरुवातीला
२१ दिवसांचा ‘लॉकडाऊन’ घोषित केल्यानंतर आता २१ दिवस काय करायचे, असा प्रश्न
अनेकांना पडला असेल, मात्र ‘लॉकडाऊन’मध्ये मिळणाऱ्या वेळेचाही सदुपयोग करता येतो,
हे कृतीतून दाखवून देण्याचे काम पुष्पा आणि गजानन या दांपत्याने केले आहे.
उन्हाळ्यात भेडसावणारी पाण्याची समस्या सोडविण्यासाठी या दांपत्याने ‘लॉकडाऊन’
काळात विहीर खोदली. प्रत्येकाने आपला
‘लॉकडाऊन’मधील वेळ सत्कारणी लावला तर हा ‘लॉकडाऊन’ कंटाळवाणा न ठरता आपल्याला
आयुष्यभर स्मरणात राहील, असे काहीतरी फलित व समाधान देणारा ठरू शकतो हे मात्र या
दाम्पत्याने दाखवून दिले आहे. जेमतेम ६ वी व १० वीपर्यंत शिक्षण झालेल्या पुष्पा
आणि गजाननचे हे काम उच्चशिक्षितांना सुद्धा वेळेचा सदुपयोग कसा करावा, याबाबतचा व्यावहारिक
दृष्टीकोन देणारा आहे, असं म्हटलं तरी वावगे ठरणार नाही.
‘पाणी लागेपर्यंत विहीर खोदण्याचा निश्चय केला होता’
आमच्या
गावात उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासते. अनेकदा सार्वजनिक विहिरीतील पाणी भरउन्हात
जावून डोक्यावर आणावे लागते. त्यामुळे लॉकडाऊनच्या २१ दिवसांत अंगणात विहीर
खोदण्याचा विचार केला. गुडी पाडव्याला या कामाला सुरुवात केली. काम सुरु करतानाचा
ठरवले होते की, कितीही कष्ट झाले तरी चालतील पण पाणी लागेपर्यंत विहीर खोदायचीच.
आम्हाला विश्वास होता की आमचे कष्ट वाया जाणार नाहीत, पाणी नक्की लागणार. त्यामुळे
सलग २१ दिवस खोदकाम केल्यानंतर २५ फुट विहीर खोडून पूर्ण झाली आणि विहिरीला पाणीही
लागले आहे. विहीर अजून १० फुट खोल करण्याचा विचार असून लॉकडाऊन संपल्यावर विहिरीचे
बांधकामही करणार आहे. या विहिरीतील पाणी उन्हाळ्यात गावातील लोकांना मोफत उपलब्ध
करून देणार असून पाळीव जनावरांना पाणी पिण्यासाठी घराच्या बाजूला हौद तयार करणार असल्याचे
पुष्पा व गजानन पखमोडे दांपत्याने यावेळी बोलताना सांगितले.
*****
Comments
Post a Comment