लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवा - पालकमंत्री शंभूराज देसाई




·         संचारबंदीची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करा
·         ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्ण क्षमतेने सुरु ठेवा
·         जिल्ह्यातील उपाययोजनांचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा
वाशिम, दि. १६ (जिमाका) : केंद्र शासनाने ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा सुरळीत पुरवठा होईल, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच रास्तभाव दुकानांमधून वितरीत होणाऱ्या अन्नधान्य वितरणाची कार्यवाही अधिक गतीने करून प्रत्येक पात्र व्यक्तीला धान्य मिळेल, याची दक्षता घेण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. वाशिम जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा पालकमंत्र्यांनी आज, १६ एप्रिल रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.
वाशिम येथून जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार आदी या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते.
पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासन चांगले काम करीत आहे. केंद्र शासनाने लॉकडाऊनचा कालावधी वाढविला असल्याने जिल्ह्यात यापुढे सुद्धा संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल, याची खबरदारी घ्यावी. जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना परवानगीशिवाय प्रवेश देवू नये, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
विविध योजनांतर्गत करण्यात येणाऱ्या धान्य वाटपाची कार्यवाही अधिक गतीने होण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रत्येक पात्र लाभार्थ्याला त्याच्या हिस्स्याचे धान्य मिळेल, यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी योग्य नियोजन करून त्याबाबतचा वेळोवेळी आढावा घ्यावा. धान्य वाटपाबाबत तक्रारी आल्यास त्यावर तातडीने कार्यवाही करावी, असे पालकमंत्री यावेळी म्हणाले. जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्ण क्षमतेने सुरु ठेवून लोकांना आरोग्य सुविधा पुरवाव्यात. तसेच याठिकाणी पुरेसा औषधी साठा उपलब्ध करून ठेवावा, असे पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.
‘त्या’ आस्थापना सुरु करण्यासाठी योग्य नियोजन करा
२० एप्रिल नंतर काही बाबींना लॉकडाऊनमधून मिळण्याची शक्यता आहे. याबाबतच्या शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यांतर त्यानुसार जिल्ह्यात कोणकोणत्या आस्थापना, उद्योग सुरु होणार आहेत, त्याचा कालावधी काय असणार आहे, याबाबत जिल्ह्यातील लोकांना माहिती द्यावी. लॉकडाऊनमधून शिथिलता मिळालेल्या आस्थापना सुरु करताना अनावश्यक गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. त्यादृष्टीने आवश्यक पूर्वतयारी करावी, असे पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात पाणी टंचाई निवारणार्थ करण्यात येणाऱ्या उपाययोजना, पाणी पुरवठा योजनांची कामे याबाबत सुद्धा नियोजन करावे, तसेच खरीप हंगामाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीचे आयोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्ह्यात ६ कोविड केअर सेंटर -जिल्हाधिकारी
जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ५० बेडचा आयसोलेशन वार्ड तयार करण्यात आला आहे. तसेच कोरोना संसर्गाची लक्षणे दिसून येणाऱ्या व्यक्तींवर उपचारासाठी जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर कोविड केअर सेंटर सुरु करण्यात येणार आहेत. या ६ सेंटरची एकूण क्षमता ५०० बेड असणार आहेत. जिल्हा वार्षिक योजनेतून आरोग्य विभागाला उपलब्ध करून देण्यात आलेल्या १ कोटी रुपयांमधून पीपीई कीट, मास्क, व्हेंटीलेटर्स खरेदी करण्यात येत आहेत, असे जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी यावेळी सांगितले. तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली.
संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल
जिल्ह्यात संचारबंदी व जिल्हाबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यात येणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत. तसेच चेकपोस्टद्वारे तपासणी सुद्धा करण्यात येत आहे. संचारबंदीचे उल्लंघन करून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येत असून त्यांची वाहने सुद्धा जप्त केली जात आहेत. सार्वजनिक ठिकाणी फिरताना चेहऱ्यावर मास्क, रुमाल, गमछा न बांधणाऱ्या व्यक्तींवर सुद्धा दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्री. परदेशी यांनी यावेळी दिली.
*****


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश