लवाद नामतालिकासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन


·       ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार अर्ज
वाशिम, दि. १५ :  अमरावती विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम २००२ चे कलम ८४ (४) अन्वये सन २०१९-२२ या कालावधीसाठी लवाद नामतालिका तयार करण्यात येणार आहे. तरी इच्छुक व पात्र व्यक्तींनी आपले विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत अमरावती सहनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात सादर करावेत. विहित नमुन्यातील अर्ज ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत अमरावती विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातून प्राप्त करून घेता येतील.
लवाद नामतालिकासाठी सर्व न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश व सेवानिवृत विधी अधिकारी, प्रॅक्टीसींग अॅडव्होकेट्स, चार्टंड अकाऊटंट, कॉस्ट अकाऊटंट, राष्ट्रीयकृत बँका, ग्रामिण बँका, भूविकास बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँका, नागरी सहकारी बँका, राज्य सहकारी बँक यांचे सेवेतील व्यवस्थापक दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेले सेवानिवृत्त अधिकारी (ज्यांना सेवानिवृत्त होऊन दोन वर्षांपेक्षा कमी कालावधी झाला आहे), सहकार विभागातील उपनिबंधक दर्जापेक्षा वरच्या दर्जाचे सेवानिवृत्त अधिकारी (ज्यांना सेवानिवृत्त होऊन दोन वर्षांपेक्षा कमी कालावधी झाला आहे) आदी अर्ज करून शकतात.
अर्जदार व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल नसावेत, अर्जदार हा शासकिय, बँक सेवानिवृत्त अधिकारी यांची कोणत्याही प्रकारची खाते चौकशी सुरू नसावी व सेवेत कोणताही ठपका ठेवलेला नसावा, अशा व्यक्ती कोणत्याही काळ्या यादीत (ब्लॅक लिस्ट) समाविष्ट नसावी, अर्जदार व्यक्ती संबंधीत विभागाच्या विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, कार्यालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या जिल्ह्यातील रहिवासी असावी. एका व्यक्तीला एकाच वेळी एकाच जिल्ह्यातून अर्ज दाखल करता येईल.
अर्जाचे विहीत नमुने विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, अमरावती विभाग, सहकार संकुल, कांता नगर, जुना बायपास रोड, महसुल भवन कार्यालयासमोर, अमरावती या कार्यालयात ३० नोव्हेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत मिळू शकतील. अर्ज सादर करण्याची अंतीम मुदत ३० नोव्हेंबर २०१८ आहे. प्राप्त अर्जांची छाननी पूर्ण करून १५ जानेवारी २०१९ रोजी प्रारुप नामतालिका प्रसिध्द होईल. ही नामतालिका अमरावती विभागीय सहनिबंधक कार्यालयात लावण्यात येईल. प्रारूप नामतालिकेवर हरकती असल्यास drcslaw@gmail.com या ई-मेलवर पुराव्यासह हरकती ३१ जानेवारी २०१९ पर्यंत स्वीकारण्यात येतील. हरकतींचा निर्णय घेऊन २८ फेब्रुवारी २०१९ रोजी अंतिम लवाद नामतालिका प्रसिद्ध करण्यात येईल. याबाबतची जाहीर सुचना अमरावती विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे, असे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे