राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांनी हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन


वाशिम, दि. १७ : जिल्ह्यातील सर्व राज्य शासनाच्या निवृत्तीवेतन धारक तथा कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी नोव्हेंबर २०१८ मध्ये हयात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यापैकी कोणत्याही एका पद्धतीने १५ डिसेंबर २०१८ पर्यंत आपले हयात प्रमाणपत्र सादर करावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी चंद्रकांत खारोडे यांनी केले आहे.
निवृत्तीवेतनधारक ज्या बँकेतून आपले निवृत्तीवेतन घेत आहेत, त्या बँकेत जिल्हा कोषागार कार्यालयाने निवृत्तीवेतनधारकांची यादी पाठविली आहे. सर्व निवृत्तीवेतन धारकांनी १५ डिसेंबर २०१८ पर्यंत संबंधित बँकेशी संपर्क साधून आवश्यक पुराव्यासह या यादीवर स्वाक्षरी करावी.
वाशिम जिल्हा कोषागार कार्यालय व अधिनस्त तालुकास्तरावरील उपकोषागार कार्यालयामध्ये जीवनप्रणाली कार्यान्वीत करण्यात आली आहे. याठिकाणी निवृत्तीवेतनधारक आधारकार्ड, बँक पासबुक व मोबाईल घेवून हजर राहून हयात प्रमाणपत्र ऑनलाईन सादर करू शकतात.
हयात प्रमाणपत्रावर आपला निवृत्ती वेतन प्रदान आदेश, बँक खाते क्रमांक व शाखा नमूद करून सदर प्रमाणपत्रावर निवृत्तीवेतनधारकाने राजपत्रित अधिकारी यांच्या समक्ष स्वाक्षरी करून हे प्रमाणपत्र राजपत्रित अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसह जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करता येईल. अशा तीन विविध पर्यायांपैकी कोणत्याही एक पद्धतीने १५ डिसेंबरपर्यंत हयात प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. या प्रमाणपत्राशिवाय डिसेंबर २०१८ चे निवृत्तीवेतन अदा करण्यात येणार नाही, असे जिल्हा कोषागार अधिकारी श्री. खारोडे यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे