डिजिटल युगात प्रसारमाध्यमांची जबाबदारी वाढली
·
राष्ट्रीय
पत्रकार दिनानिमित्त आयोजित चर्चासत्रातील सूर
वाशिम, दि. १६ : आजच्या डिजिटल युगात
पत्रकारितेसाठी विविध साधने उपलब्ध झाल्याने बातमी तयार करणे व पाठविणे, तसेच ती
प्रसिद्ध करण्याच्या सुविधा वाढल्या आहेत. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत पत्रकारिता
सोपी झाली असली तरी आजच्या युगात प्रसारमाध्यमांची जबाबदारी मोठ्या प्रमाणात वाढली
आहे, असा सूर आज जिल्हा माहिती कार्यालयात ‘डिजिटल युगातील पत्रकारिता : आचारनिती
आणि आव्हान’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ऐकावयास मिळाला. राष्ट्रीय पत्रकार
दिनाचे औचित्य साधून या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्राचे मुख्य
वक्ता म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील अंतर्गत लेखा परीक्षक युसुफ शेख उपस्थित
होते.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांच्यासह सुनील
मिसर, चंद्रकांत लोहाना, सुनील कांबळे, अनिल आतिश देशमुख, अनिल वाल्ले, अजय ढवळे, गजानन
भोयर, संदीप पिंपळकर, निलेश सोमाणी, प्रदीप टाकळकर, सारनाथ अवचार, सुभाष देवहंस
आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.
यावेळी श्री. शेख म्हणाले, आज माहितीचे डिजिटलायझेशन
झाल्याने इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या मोबाईलवर सुद्धा विविध प्रकारची माहिती
आपण उपलब्ध करून घेऊ शकतो. जगभरातील कोणत्याही वृत्त संस्थेची बातमी आपण वेब
पोर्टलमुळे घर बसल्या पाहू शकतो. डिजिटल युगामध्ये आपल्याकडे असलेली माहिती वाचकांपर्यंत
तातडीने पोहोचविण्याची सुविधा माध्यमांना उपलब्ध झाली आहे. त्यामुळे अशी माहिती
पोहोचविण्याची स्पर्धा सुद्धा कमालीची वाढली आहे. या स्पर्धेमुळे चुकीची माहिती
प्रसारित होण्याची शक्यता सुद्धा वाढली आहे. तसेच आज सोशल मिडियाच्या माध्यमातून
प्रसारित होणारी माहितीची खातरजमा करणे किचकट काम असल्याने फेक न्यूज सारखे प्रमाण
वाढले आहे. यामुळे माध्यमांसमोर नवीन आव्हान निर्माण झाले आहे.
डिजिटल युगात निर्माण झालेल्या समाज विघातक प्रवृत्तीच्या
विरोधात आवाज उठविणे, तसेच सायबर सुरक्षेविषयी समाज जागृती करण्यासारखे समाज
प्रबोधनाचे कामही पत्रकारांनी करावे, असे आवाहन श्री. शेख यांनी यावेळी केले.
श्री. मिसर म्हणाले, डिजिटल युगात सोशल मिडिया, संकेतस्थळांसारख्या
माध्यमांमुळे वृत्तपत्रे संकटात येतील, असे मत व्यक्त केले जात होते. मात्र आजही
लोकांचा वृत्तपत्रांवर अधिक विश्वास असून इतर कोणत्याही माध्यमातून आलेली बातमी
जोपर्यंत वृत्तपत्रात वाचली जात नाही, तोपर्यंत त्यावर विश्वास ठेवला जात नाही.
त्यामुळे डिजिटल युगातील नवीन माध्यमांनी सुध्दा वृत्तपात्रांसारखी विश्वासार्हता
निर्माण करण्याचे आव्हान पेलले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
श्री. कांबळे म्हणाले, इतर क्षेत्रांमध्ये कोणी कसे
वागावे, काय करावे व कार्य करू नये यासारख्या आचारसंहिता कोणीतरी त्रयस्थ यंत्रणा
ठरवून देते. मात्र पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या
माध्यमातून पत्रकारांनी स्वतःच स्वतःची आचारसंहिता ठरविण्याची सुविधा उपलब्ध करून
देण्यात आली आहे. आज डिजिटल माध्यमांच्या युगात माहितीची देवाण-घेवाण करणे सोपे
झाले असले तरी त्या माहितीची पडताळणी करणे कठीण बनले आहे. त्यामुळे आपण सोशल
मिडिया किंवा इतर माध्यमातून मिळालेली माहिती इतरांना पाठविताना त्या माहितीची
खात्री करूनच ती पुढे पाठविली पाहिजे. तसेच सोशल मिडीयाचा वापर प्रसारमाध्यम
म्हणून करताना स्वतःची आचारनिती ठरवून घेतली पाहिजे.
प्रास्ताविकात श्री. खडसे म्हणाले, डिजिटलायझेशनमुळे
आज माध्यमांचे व माध्यमातील माहितीचे स्वरूप बदलले आहे. मुद्रित माध्यमांपासून
सुरु झालेली पत्रकारिता आणि आजची डिजिटल युगातील पत्रकारिता यामध्ये खूप अमुलाग्र
बदल झाला आहे. या बदलांचा पत्रकारितेवर झालेला परिणाम, तसेच या बदलामुळे
पत्रकारितेसमोर उभी राहिलेली आव्हाने, त्याचा सामना कशा पद्धतीने करता येईल,
याविषयी उहापोह करण्यासाठी ‘डिजिटल युगातील पत्रकारिता : आचारनिती आणि आव्हान’ या
विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातील मान्यवरांच्या हस्ते आचार्य
बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती सहाय्यक तानाजी घोलप यांनी केले. कार्यक्रम
यशस्वी करण्यासाठी विजय राठोड, विश्वनाथ मेरकर यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment