महावॉकेथॉन व रील्स स्पर्धेच्या माध्यमातून माती-पाण्याच्या संवर्धनाचा संदेश द्या जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे आवाहन
महावॉकेथॉन व रील्स स्पर्धेच्या माध्यमातून माती-पाण्याच्या संवर्धनाचा संदेश द्या
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे आवाहन
वाशिम, दि. १९ ऑगस्ट (जिमाका) : माती आणि पाण्याचे संवर्धन ही काळाची गरज असून, या विषयाबाबत युवकांच्या सर्जनशीलतेचा उपयोग करून व्यापक जनजागृती निर्माण करावी. जलसंधारण सप्ताहानिमित्त राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये आयोजित ‘रील फॉर सॉईल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’ रील्स स्पर्धेत वाशिम जिल्ह्यातील १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मृद व जलसंवर्धनाचा संदेश समाजमाध्यमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
स्पर्धेसाठी ३० ते ६० सेकंदांची रील तयार करता येणार असून, माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, मातीची धूप रोखणे, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, गावातील यशस्वी मृद व जलसंधारण कामे तसेच माती व पाणी वाचविण्याच्या नाविन्यपूर्ण कल्पनांवर रील तयार करता येणार आहे. कथाकथन, अभिनय, संगीत, नृत्य, अॅनिमेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित निर्मिती, विनोदी सादरीकरण, लघुपट, आधी-नंतरची दृश्ये, ड्रोन दृश्ये किंवा अन्य नाविन्यपूर्ण पद्धतींचाही वापर करता येणार आहे.
प्रत्येक स्पर्धकाने रील स्वतःच्या सार्वजनिक इन्स्टाग्राम खात्यावर प्रसिद्ध करून ‘MahaWalkathon2026’च्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्याला टॅग करणे आवश्यक आहे. #SaveSoilSaveWater हा अधिकृत हॅशटॅग वापरणे बंधनकारक आहे. रील अपलोड करण्याचा कालावधी १५ ते १९ ऑगस्ट २०२६ असा आहे. क्यूआर कोडद्वारे नोंदणी, रीलची लिंक सादर करणे, जिल्हा निवड, पडताळणी आणि सहभाग प्रमाणपत्र अशी प्रक्रिया राहणार आहे.
स्पर्धेसाठी विषय व संदेश ३०, कल्पकता २५, प्रभावी सामाजिक संदेश २०, सादरीकरण व तांत्रिक गुणवत्ता १५ आणि समाजमाध्यमांवरील सहभाग १०, असे एकूण १०० गुणांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. केवळ आवडी अथवा अनुयायांच्या संख्येवर विजेता निश्चित न करता तज्ज्ञ परीक्षण आणि समाजमाध्यमांवरील सहभागाचा समतोल साधला जाणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यात प्रथम क्रमांकासाठी २५ हजार रुपये व गौरवचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये व गौरवचिन्ह आणि तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपये व गौरवचिन्ह देण्यात येणार आहे. पात्र सहभागींना ई-प्रमाणपत्र देण्यात येणार असून विजेत्यांचा ‘युवा मृद-जलदूत’ म्हणून गौरव करण्यात येणार आहे.
महा वॉकेथॉनमध्येही नागरिकांनी सहभागी व्हावे
२१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिनानिमित्त आयोजित क्रिडा संकुल येथे ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ उपक्रमात जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. माती व पाण्याच्या संवर्धनाचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी युवकांनी रील्स स्पर्धेत, तर नागरिकांनी महा वॉकेथॉनमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा. ‘एक रील... मातीसाठी! एक रील... पाण्यासाठी! एक रील... सुरक्षित भविष्यासाठी!’ हा संदेश व्यापक करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
अधिकृत समाजमाध्यम खाती :
Instagram : @mahawalkathon2026
Facebook : MahaWalkathon2026
X : @MahaWalkathon26
Comments
Post a Comment