वाशिम एमआयडीसीच्या पायाभूत सुविधांसाठी ४८ कोटी ६७ लाखांचा निधी मंजूर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नांना यश उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मानले आभार


वाशिम एमआयडीसीच्या पायाभूत सुविधांसाठी ४८ कोटी ६७ लाखांचा निधी मंजूर

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नांना यश

उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मानले आभार

वाशिम, दि. १८ ऑगस्ट (जिमाका) : जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी वाशिम एमआयडीसीच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी एकूण ४८ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पालकमंत्री तथा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झालेल्या या निधीमुळे एमआयडीसीतील रस्ते, पाणीपुरवठा, वीज तसेच उद्योगांसाठी आवश्यक पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार आहे.

वाशिम एमआयडीसीमधील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पुढाकारातून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मंत्रालयातील दालनात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत एमआयडीसीच्या विकासासह उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

वाशिम एमआयडीसीतील रस्ते विकासासाठी १८ कोटी रुपये, तर पाणीपुरवठा सुविधांसाठी १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच महावितरणच्या कामांसाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ३ कोटी ८२ लाख रुपयांचा निधी देण्याचे मान्य केले आहे.

याशिवाय एमएसएमई पार्कच्या विकासासाठी १० कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून एमएसएमई क्षेत्रातील उद्योजकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण होण्यास मदत होणार असून, वाशिम जिल्ह्यात नव्या उद्योगांना प्रोत्साहन मिळण्यासह गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी वाढण्याची अपेक्षा आहे.

वाशिममध्ये लॉजिस्टिक पार्क उभारण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. यासंदर्भात संबंधित बाबींची माहिती घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

उद्योजकांना विविध परवानग्या जलदगतीने मिळाव्यात यासाठी एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी अकोला येथे आठवड्यातून एक दिवस अनिवार्यपणे उपस्थित राहून परवानगीसंदर्भातील प्रकरणांचा निपटारा करण्याच्या सूचना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिल्या.

वाशिमच्या औद्योगिक विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले. मंजूर निधीमुळे वाशिम एमआयडीसीच्या विकासाला गती मिळून जिल्ह्यात उद्योग, रोजगार आणि गुंतवणुकीच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे. वाशिमच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देण्यासाठी शासन कटिबद्ध असून, एमआयडीसीतील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे.

बैठकीस खासदार संजय देशमुख, आमदार भावना गवळी, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार श्याम खोडे, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी, औद्योगिक विकास संघटनेचे अध्यक्ष अंगद राऊत आणि सचिव अतुल भोतकर यांच्यासह संबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर