विशेष लेख २१ ऑगस्ट जलसंधारण दिन ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा विचार जनचळवळीत रूपांतरित करण्याचा संकल्प..जलनायक सुधाकरराव नाईक यांच्या दूरदृष्टीचे स्मरण..शाश्वत जलव्यवस्थापनासाठी लोकसहभागाची गरज



विशेष लेख 

२१ ऑगस्ट जलसंधारण दिन 

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा विचार जनचळवळीत रूपांतरित करण्याचा संकल्प

जलनायक सुधाकरराव नाईक यांच्या दूरदृष्टीचे स्मरण

शाश्वत जलव्यवस्थापनासाठी लोकसहभागाची गरज

पाणी म्हणजे जीवन. शेती, उद्योग, पर्यावरण, मानवी जीवन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था या सर्वांचा आधार पाण्यावर आहे. मात्र पावसाचे बदलते स्वरूप, वाढती लोकसंख्या, भूजलाचा वाढता वापर आणि जलस्रोतांवरील वाढता ताण यामुळे भविष्यातील पाण्याचे नियोजन हा केवळ शासनाचा विषय राहिलेला नाही. प्रत्येक नागरिकाच्या सहभागातून जलसंधारणाची व्यापक लोकचळवळ उभी करण्याची गरज निर्माण झाली आहे. याच विचाराला बळ देण्यासाठी २१ ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जात आहे.

मृद व जलसंधारण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन साजरा केला जात आहे. त्यांच्या जलसंधारणविषयक दूरदृष्टीचे स्मरण करून जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा संदेश या दिनाच्या माध्यमातून दिला जातो. यंदा १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून २१ ऑगस्ट रोजी सर्व ३६ जिल्ह्यांत ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

जलनायक सुधाकरराव नाईक यांची दूरदृष्टी

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सुधाकरराव नाईक यांनी जलसंधारणाला विकासाच्या केंद्रस्थानी आणले. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश त्यांनी प्रभावीपणे जनमानसात रुजविला. पावसाचे पाणी वाहून जाऊ न देता ते स्थानिक पातळीवर अडविणे, जमिनीत मुरविणे आणि उपलब्ध पाण्याचा शेतीसह विविध गरजांसाठी नियोजनबद्ध वापर करणे, हा त्यांच्या जलधोरणाचा गाभा होता.

दुष्काळावर केवळ तात्पुरत्या उपाययोजनांनी मात करता येणार नाही, तर पाणलोट क्षेत्राचा शास्त्रीय विकास, जलस्रोतांचे संवर्धन आणि भूजलपातळी वाढविण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक आहेत, ही भूमिका त्यांनी मांडली. त्यांच्या प्रयत्नांतून जलसंधारणाला स्वतंत्र प्रशासकीय महत्त्व प्राप्त झाले. महाराष्ट्र शासनाने ५ जून १९९२ रोजी जलसंधारण विभागाची स्थापना केली असून जलसंधारण, मृदसंधारण, पाणलोट विकास आणि लघु सिंचनासह विविध योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी या विभागाकडे आहे.

पाणलोट विकासातून जलसमृद्धीकडे

पाणलोट क्षेत्राचा विकास हा जलसंधारणाचा मूलभूत आधार आहे. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरविल्यास जमिनीतील ओलावा टिकतो, भूजलपातळी सुधारते आणि शेतीसाठी उपलब्ध पाण्याचे प्रमाण वाढण्यास मदत होते. त्यामुळे बंधारे, पाझर तलाव, साठवण तलाव, नाला बांध आणि अन्य जलसंधारणाच्या कामांना महत्त्व प्राप्त झाले.

आजही राज्यात विविध जलसंधारणाच्या माध्यमातून जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि सिंचन क्षमता पुनर्स्थापित करण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत पाझर तलाव, गाव तलाव, साठवण तलाव, सिंचन तलाव, साठवण बंधारे, सिमेंट नाला बांध आदी जलस्रोतांची विशेष दुरुस्ती करून सिंचन क्षमता पुनर्स्थापित केली जात आहे.

जलसंधारण ही केवळ शासनाची जबाबदारी नाही

जलसंधारणाची कामे शासनाच्या योजनांमधून होत असली, तरी त्यांचे दीर्घकालीन यश लोकसहभागावर अवलंबून असते. गावातील जलस्रोतांची स्वच्छता, पाण्याचा काटकसरीने वापर, पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे, वृक्षसंवर्धन, मृदसंधारण आणि भूजल पुनर्भरण यामध्ये नागरिकांची भूमिका महत्त्वाची आहे.

जलसंधारण विभागाच्या कामकाजातही लोकसहभागावर आधारित ग्रामीण विकास आणि पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाला महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे जलसंधारणाची प्रत्येक कामे ही केवळ बांधकामाची प्रक्रिया न राहता गावाच्या भविष्यातील जलसुरक्षेचा आधार बनणे आवश्यक आहे.

‘वॉक फॉर वॉटर’मधून जलजागृतीचा संदेश

जलसंधारण सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ हा उपक्रम जलसंधारणाच्या संदेशाला व्यापक लोकसहभाग मिळवून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत होणाऱ्या या उपक्रमातून मृद व जलसंधारणाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

चालण्याचा हा उपक्रम केवळ शारीरिक सहभागाचा कार्यक्रम नसून पाण्यासाठी, भविष्यासाठी आणि पुढील पिढ्यांसाठी सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचा संदेश देणारा आहे. गावागावांत जलसंधारणाची कामे, शेतशिवारात पाणी अडविण्याच्या उपाययोजना आणि घराघरांत पाण्याच्या काटकसरीच्या वापराची सवय निर्माण झाली, तर जलसुरक्षेच्या दिशेने मोठे पाऊल पडू शकते.

प्रत्येक थेंब जपण्याची वेळ

आज हवामान बदलामुळे पावसाचे स्वरूप अनिश्चित होत आहे. काही ठिकाणी अल्प कालावधीत मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो, तर काही भागांत पावसाचे प्रमाण कमी राहते. अशा परिस्थितीत पावसाचे पाणी साठविणे आणि जमिनीत मुरविणे अधिक महत्त्वाचे ठरते. जलस्रोतांचे संरक्षण आणि भूजल पुनर्भरण याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देतानाच त्याचा कार्यक्षम वापर करणे, सूक्ष्म सिंचनाला प्रोत्साहन देणे, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे आणि पाणलोट क्षेत्राचे संवर्धन करणे ही आजची प्रमुख गरज आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब मौल्यवान आहे, ही जाणीव समाजाच्या सर्व स्तरांत निर्माण झाली पाहिजे.

जलसंधारण दिनाचा संकल्प

सुधाकरराव नाईक यांनी दिलेला ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश आजच्या काळात अधिक व्यापक अर्थाने स्वीकारण्याची गरज आहे. जलसंधारण ही एखाद्या दिवसापुरती मोहीम नसून वर्षभर चालणारी प्रक्रिया आहे. गावातील तलाव, बंधारे, नाले, विहिरी आणि इतर जलस्रोतांचे संरक्षण करण्यापासून ते पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यापर्यंत प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्त्वाची आहे.

जलसंधारण दिन हा जलनायक सुधाकरराव नाईक यांच्या कार्याचे स्मरण करण्याबरोबरच महाराष्ट्राच्या जलभविष्याचा विचार करण्याचा दिवस आहे. आज अडवलेला पावसाचा प्रत्येक थेंब उद्याच्या शेतीला, गावाला आणि समाजाला आधार देऊ शकतो. त्यामुळे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा; जलसंपन्न महाराष्ट्र घडवा’ हा विचार प्रत्येक गावाच्या विकासाचा आणि प्रत्येक नागरिकाच्या जीवनाचा भाग बनविणे, हीच जलसंधारण दिनाची खरी फलश्रुती ठरेल.


संकलन -
अनिल कुरकुटे,
जिल्हा माहिती कार्यालय 
वाशिम.

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर