लोकसभा निवडणुकीसाठी यंत्रणांनी सज्ज राहावे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस


लोकसभा निवडणुकीसाठी यंत्रणांनी सज्ज राहावे

जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस

वाशिम (जिमाका) : लोकसभा निवडणुकांबाबत भारत निवडणूक आयोगाने कडक निर्देश दिले असून स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक गांभीर्याने घ्यावी व यंत्रणांनी सज्ज राहून समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी अधिकाऱ्यांना दिले.

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था तसेच आदर्श आचार संहिता अनुपालनाविषयी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी दि.१४ मार्च रोजी पूर्वतयारीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात ही बैठक पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या. 

या बैठकीला पोलीस अधीक्षक अनुज तारे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कैलास देवरे, वैशाली देवकर यांच्यासह विविध विभागाचे नोडल अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

या बैठकीत इलेक्टोरल बॅान्ड, दारु प्रतिबंध, परवानाधारक शस्त्र प्रतिबंध, असुरक्षित व गंभीर मतदान केंद्रांवरील सुरक्षा, जप्ती प्रक्रिया, सीव्हिजिल ॲप,भरारी पथके, स्थिर संनिरीक्षण चमू, तक्रार निवारण कक्ष मतदान केंद्रावर सीसीटिव्ही यंत्रणा, बॅलेट पेपर आदी विषयांचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी घेतला. 

आदर्श आचार संहिता केव्हाही लागू होवू शकते. यंत्रणांनी सज्ज राहावे. निवडणूक काळात तहसिलदार आणि पोलीस निरीक्षकांसह विविध पथकातील कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे. निवडणुकांच्या कामाना प्राधान्य द्यावे. काही शंका असल्यास त्याचे निरसन करुन घ्यावे. यंत्रणांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल किंवा माहिती वेळेत द्यावी. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने समन्वय राखून जबाबदारी पार पाडावी. पथकांमध्ये नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुन्हा प्रशिक्षण द्यावे. निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्याचा अभ्यास करुन त्यानुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यवाही करावे आदी निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी यावेळी दिले. 

यावेळी निवासी उप जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कैलास देवरे यांनी सादरीकरण केले. याबैठकीत निवडणूक विभागातील नायब तहसिलदार सतिश काळे व कर्मचारी उपस्थित होते.
००००

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे