मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करा-डॅा. पंकज आशिया


मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करा
-डॅा. पंकज आशिया

निवडणूक निर्णय अधिकारी डॅा. आशिया यांनी घेतला वाशिम, कारंजा मतदारसंघातील पूर्वतयारीचा आढावा

वाशिम (जिमाका) : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघांतर्गत कारंजा आणि वाशिम विधानसभा मतदारसंघातील निवडणूक पूर्वतयारीचा आढावा यवतमाळचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॅा. पंकज आशिया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. यावेळी मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी डॅा. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या आढावा सभेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वाशिम आणि कारंजा विधानसभा मतदारसंघातील निवडणूकविषयक सर्व बाबींचा आढावा घेण्यात आला. यावेळी वाशिमच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राम लंके, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, वाशिम व कारंजाचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, ठाणेदार, नायब तहसीलदार आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या आढावा बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी डॅा. पंकज आशिया यांनी मतदान केंद्रावरील मूलभूत सुविधांची सद्यस्थिती, अतिसंवेदनशिल मतदान केंद्राची माहिती, फिरते पथक, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, प्रशिक्षण, वाहतूक व्यवस्थापन, मतदार संख्या,ईव्हीएम व व्हिव्हिपॅटची उपलब्धता, मतदान पथके आदी विषयांचा विस्तृत आढावा घेतला. 

यावेळी वाशिम व कारंजा मतदारसंघातील मतदान केंद्रांची पाहणी करुन त्याठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात. मतदानाची कमी टक्केवारी असलेल्या भागात जनजागृती करुन मतदानाचा टक्का वाढविण्याचा प्रयत्न करा. मतदान का गरजेचे आहे त्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करा. मतदान केंद्रांपर्यंत जाऊ न शकणाऱ्या ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या वयोवृद्ध नागरिक आणि दिव्यांगाना घरून मतदान करता येणार असून त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना देवून आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश डॅा. आशिया यांनी अधिकाऱ्यांना दिले.

००००

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे