प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम-सुरज पोर्टलचे लोकार्पण*पीएम योजनांच्या लाभार्थी संवाद कार्यक्रमात वाशिमचे लाभार्थी सहभागी


*प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम-सुरज पोर्टलचे लोकार्पण*

पीएम योजनांच्या लाभार्थी संवाद कार्यक्रमात वाशिमचे लाभार्थी सहभागी

            वाशिम, (जिमाका): देशातील वंचित व मागासवर्गातील जनतेच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या पीएम-सूरज पोर्टलचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्रधानमंत्री यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला. या संवाद कार्यक्रमात वाशिम जिल्ह्यातील लाभार्थी सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित या संवाद व पोर्टल लोकार्पण कार्यक्रमास जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, समाज कल्याण सहायक आयुक्त मारुती वाठ, एसबीआयचे व्यवस्थापक दिलीप मोहपात्रा, महात्मा फुले विकास महामंडळाचे व्यवस्थापक सुरेंद्र यावलीकर, समाज कल्याण निरीक्षक राहुल शिरभाते, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक शंकर कोकडवार, दिपा हिरोळे आणि जिल्ह्यातील लाभार्थी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, पीएम-सूरजच्या माध्यमातून वंचित आणि मागासवर्ग घटकांसाठी आर्थिक सहायता तसेच उद्योगांसाठीचे कर्ज सहज उपलब्ध होणार आहे. एससी, एसटी आणि ओबीसी समुदायांना सक्षम करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. या समुदायातील तरुणांसाठी शिष्यवृत्तीत वाढ, वैद्यकीय जागांच्या अखिल भारतीय कोट्यामध्ये ओबीसींसाठी २७ टक्के जागांचे आरक्षण तसेच नीट परीक्षेत ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रवेश आणि वंचित समुदायातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना विज्ञानाशी संबंधित विषयात पीएच.डी करता यावी यासाठी नॅशनल फेलोशिपची रक्कमही वाढवण्यात आली आहे. वंचित व मागास घटकांचा विकास झाल्याशिवाय देश विकसित होणार नाही. त्यामुळे देशातील वंचित आणि मागास घटकांच्या विकासावर केंद्र सरकार भर देत असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या हस्ते जिल्ह्यातील तुळशीराम मोतीराम राऊत यांना २ लाख ४० हजार आणि रामकिसन सरदार यांना ६० हजाराचे कर्ज वितरित करण्यात आले. तर सुरज शृंगारे यांना आयुष्मान भारत कार्ड आणि पीपीई कीट वितरित करण्यात आले.

             या लाभार्थी संवाद कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अहमदनगर जिल्ह्यातील नरेश साहेबराव अवचर या उद्योजकाशी संवाद साधून त्यांच्या कामगिरीचे कौतूक केले.

            यावेळी देशातील १ लाख लाभार्थ्यांना पंतप्रधान सामाजिक उन्नती आणि रोजगाराधारित जनकल्याण (पीएम-सूरज) राष्ट्रीय पोर्टलच्या माध्यमातून ७२० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ आणि राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ या तीन राष्ट्रीय महामंडळामार्फत देशातील सर्व राज्यातील अनुसूचित जाती, इतर मागास वर्ग व सफाई कर्मचारी यांना अर्थसहाय्य करण्यासाठी सूरज पोर्टल सुरू करण्यात आले आहे. समाजातील सर्वात उपेक्षित घटकांचे उत्थान करणे हे या पोर्टलचे उद्दिष्ट आहे.
०००

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे