प्रत्येक मराठी माणसाने मराठीचा अभिमान बाळगावा
· मराठी भाषा गौरव दिनी मान्यवरांचे प्रतिपादन · जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचा उपक्रम वाशिम , दि. २७ : मराठी ही आपली मातृभाषा आहे. सुमारे २ हजार वर्षांचा इतिहास असलेल्या मराठी भाषेचा प्रत्येक मराठी माणसाने अभिमान बाळगला पाहिजे, असे मत मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातील प्रमुख वक्त्यांनी मांडले. वाशिम जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या विद्यमाने आज, २७ फेब्रुवारी रोजी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठी भाषेचे अभ्यासक, लेखक प्रा. गजानन वाघ, सुप्रसिद्ध कवी मोहन शिरसाट व कवी महेंद्र ताजणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी ज. सु. पाटील यांच्यासह पत्रकार, युवक-युवतींची उपस्थिती होती. ग्रंथपूजनाने कार्यक्रमाचे उदघाटन झाले. तसेच यावेळी उपस्थितांना मराठी भाषेच्या संवर्धनाची प्रतिज्ञा देण्यात आली. ...