शाहू महाराजांचे विचार समाजात रुजणे आवश्यक - हर्षदा देशमुख
·
सामाजिक
न्याय दिनानिमित्त विविध उपक्रम
वाशिम, दि. २६ : तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षण
पोहोचवून त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या, त्यांना प्रगतीची समान संधी
देवून सामाजिक समतेसाठी प्रयत्न करणाऱ्या राजर्षि शाहू महाराज यांचे विचार समाजात
रुजणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी व्यक्त
केले. सामाजिक न्याय दिनानिनिमित्त आज सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
विभागाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजित कार्यक्रमात
अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या.
जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेच्या समाज
कल्याण समितीच्या सभापती पानुताई जाधव, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या
उपायुक्त डॉ. छाया कुलाल, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार, जिल्हा समाज
कल्याण अधिकारी सुनील खमितकर, वाशिम नगरपरिषदचे मुख्याधिकारी वसंत इंगोले, डॉ.
बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारप्राप्त गोपाळराव आटोटे, धोंडूजा इंगोले, सु.
ना. खंडारे, शिवमंगलअण्णा राऊत, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन
अधिकारी अनंत मुसळे, सुमन पट्टेबहाद्दूर, संतोष खडसे, चंद्रभान पौळकर, निलेश
सोमाणी यांची यावेळी उपस्थिती होती.
सौ. देशमुख म्हणाल्या, समाजाचा विकास करावयाचा असेल तर
सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे, हे शाहू महाराजांनी जाणले होते. विविध जाती,
धर्माच्या लोकांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी त्यांनी शाळा, वसतिगृहे सुरु केली.
तसेच शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य म्हणून शिष्यवृत्ती सुरु केल्या. राजर्षि शाहू
महाराज यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य आजही मार्गदर्शक आहे. सामाजिक एकात्मता
निर्माण होण्यासाठी सुद्धा शाहू महाराजांनी केलेले प्रयत्न आजही प्रेरणादायी आहेत.
त्यांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी सामाजिक न्याय दिनाच्या
माध्यमातून प्रयत्न व्हावेत, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, राजर्षि शाहू
महाराजांचे शिक्षणविषयक कार्य अतिशय मूलगामी स्वरूपाचे आहे. बहुजन समाजाच्या
शिक्षणसाठी व सामाजिक समता निर्माण होण्यासाठी शाहू महाराजांनी केलेले प्रयत्न
आजही मार्गदर्शक ठरणारे आहेत. तसेच समाज कल्याणासाठी शाहू महाराजांनी मांडलेल्या
विचारानुसारच आज सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून प्रयत्न होत
आहेत. या विभागाच्या योजना जास्तीत जास्त प्रभावीपणे राबवून त्याचा लाभ तळागाळातील
गरजू लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासन व समाज कल्याण विभाग प्रयत्नशील
असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री. आटोटे म्हणाले, सामाजिक एकात्मता निर्माण
होण्यासाठी राजर्षि शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी या थोर महापुरुषांचे
विचार डोळसपणे समजून घ्यावेत व त्यानुसार आचरण करावे.
श्री. खंडारे यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले.
श्री. सोमाणी यांनी व्यसनमुक्तीविषयी मार्गदर्शन केले. शाहीर खडसे यांनी राजर्षि
शाहू महाराज यांच्या कार्याविषयी माहिती देणारा कार्यक्रम सादर केला, तर श्रीमती
पट्टेबहाद्दूर यांनी कविता वाचन केले.
प्रास्ताविक श्रीमती केदार यांनी केले. तसेच विधिमंडळ
अधिवेशनामुळे पालकमंत्री संजय राठोड यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले
नाही, त्यामुळे त्यांनी या कार्यक्रमासाठी पाठविलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन
श्रीमती केदार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बारड यांनी केले, तर
आभार प्रा. अतुल राऊत यांनी मानले. सामाजिक न्याय दिनानिमित्त निबंध स्पर्धा,
वक्तृत्व स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. कार्यक्रमाचा
समारोप वृक्षारोपणाने झाला.
आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यांना अर्थसहाय्य
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने आंतरजातीय
विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य अनुदान दिले जाते.
त्यानुसार आज झालेल्या कार्यक्रमात विपिन भीमजीयानी व शीतल राठोड, संदीप जोगी व
शीला राठोड, प्रशांत कांबळे व भाग्यश्री उमक या दाम्पत्यांना प्रत्येकी ५० हजार
रुपयांचा धनादेशाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
दिंडीतून सामाजिक समतेचा संदेश
सामाजिक न्याय दिन सोहळ्यानिमित्त सामजिक समता दिंडीचेही
आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद समाज कल्याण समिती सभापती पानुताई जाधव व
समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून समता दिंडीला सुरुवात झाली.
बसस्थानक, सिव्हील लाईन्समार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर येथे आल्यानंतर या दिंडीचा
समारोप करण्यात आला. या समता दिंडीत श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय,
श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय, शासकीय वसतिगृह, शासकीय निवासी शाळेचे
विद्यार्थी, प्राध्यापक, गृहपाल व जिल्ह्यातील समता दूत सहभागी झाले होते.
*****
Comments
Post a Comment