योग दिनात सर्वांचा सहभाग महत्वाचा - हृषीकेश मोडक
21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस
सकाळी 7 ते सकाळी 8 दरम्यान जिल्हयात
आयोजन
विविध सेवाभावी संस्थांचा सहभाग
घेणार
तालुका पातळीवर व 92 प्राथमिक
आरोग्य उपकेंद्रावर आयोजन
वाशिम, दि. 17
: व्यक्तीच्या जीवनात शारीरिक आणि आत्मिक विकासासाठी योग
विद्येचे महत्व आहे. हे महत्व ओळखून संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय
योग दिन म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले आहे. जगातील 200 देशात हा दिवस साजरा करण्यात
येतो. येत्या 21 जून रोजी जिल्हयातील ग्रामीण आणि शहरी भागात साजरा करण्यात येणाऱ्या
योग दिनात सर्वांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी हृषीकेश
मोडक यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आज
17 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आयोजनासाठी आयोजित बैठकीत श्री. मोडक बोलत
होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, अपर पोलीस
अधीक्षक विजयकुमार चव्हाण, पतंजलीचे डॉ. भगवंत वानखेडे, आर्ट ऑफ लिव्हींगचे डॉ. हरीष
बाहेती यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. मोडक पुढे म्हणाले, योग दिनाचे औचित्य
साधून जिल्हयातील नागरिकांना योगाबाबत जागरुक करण्यास मोठा हातभार लागेल. त्यामुळे
प्रत्येक जण दररोज योग कसा करता येईल व तो आपण नियमित केला पाहिजे यासाठी पुढाकार घेतील.
केवळ शहरी भागातच योगाचे महत्व पटवून न देता आता ग्रामीण भागातील नागरिकांना देखील
योगाचे महत्व पटवून देवून त्यांच्या शारिरीक आणि आत्मीक विकासासाठी लक्ष देणे गरजेचे
आहे, असे त्यांनी सांगीतले.
श्री. मीना म्हणाले, जिल्हा परिषदेच्या आरोग्य
विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागात 21 जून हा योग दिवस मोठया प्रमाणात साजरा करण्याचे
नियोजन करण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पातळीवर तज्ञ प्रशिक्षकांच्या माध्यमातून
ग्रामस्थांना सकाळी 7 ते सकाळी 8 वाजतापर्यंत विविध प्रकारचे योग शिकवून त्यांना दैनंदिन
जीवनात योगाचे महत्व पटवून देण्यात येईल. प्रत्येक तालुक्यासाठी 15 योग प्रशिक्षक व्यक्ती
लागणार असून पतंजली आणि आर्ट ऑफ लिव्हींगच्या पदाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाशी योग्य
समन्वय साधून प्रशिक्षीत व्यक्ती उपलब्ध करुन दयावी. त्यामुळे 21 जून योग दिवस ग्रामीण
भागात मोठया प्रमाणात साजरा करता येईल.
डॉ. बाहेती म्हणाले, जिल्हयात 21 जून हा योग
दिवस जिल्हयात एकाच वेळी म्हणजे सकाळी 7 ते सकाळी 8 वाजता या वेळेत साजरा करावा. योग
दिनाचे जिल्हयात यशस्वी आयोजन करण्यासाठी स्वयंसेवी सेवाभावी संस्थांनी सहभागी व्हावे.
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पातळीवर ग्रामीण भागात साजरा करण्यात येणाऱ्या योग दिवसाला
योग प्रशिक्षीत व्यक्ती पाठवावे. त्यामुळे नागरिकांना चांगले प्रशिक्षण घेण्यास मदत
होईल असे सांगीतले.
प्रास्ताविकातून
जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. शेटिये यांनी 21 जून रोजी जिल्हयात आयोजित करण्यात येणाऱ्या
आंतरराष्ट्रीय योग दिनाची माहिती दिली. आयुष मंत्रालय, भारत सरकार आणि आयुष संचालनालय
महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त वतीने जिल्हा प्रशासनाचा जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रम
वाशिम येथील वाटाणे लॉन येथे 21 जून रोजी सकाळी 7 ते सकाळी 8 वाजता या वेळेत हा कार्यक्रम
घेणार आहे. जिल्हयात सुध्दा याच वेळेत हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती श्री. शेटिये
यांनी दिली.
जिल्हयात तालुकापातळीवर मानोरा येथे राधाकृष्ण
मराठी शाळेमध्ये स्वातीताई नागपुरे, कारंजा येथे तालुका क्रीडा संकुल येथे गजानन धर्माळे
व अर्चना कदम, मंगरुळपीर येथील तालुका क्रीडा संकुलात नंदकिशोर इंगोले, कल्याणी व्यवहारे
व श्री. ठाकरे, मालेगाव येथील एन.एन. मुंदडा हायस्कुल येथे अर्चना मंत्री, गोपाल राऊत
व श्री. जावडे आणि रिसोड येथील बाबासाहेब धाबेकर महाविद्यालयात शितल जिरवणकर हया उपस्थितांना
योगाबाबत 21 जून रोजी सकाळी 7 ते सकाळी 8 यावेळेत प्रशिक्षण देतील. वाशिम तालुक्याचा
कार्यक्रम हा वाटाणे लॉन येथे आयोजित जिल्हयाच्या मुख्य कार्यक्रमात होणार आहे.
योग
दिनाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी विविध शासकीय यंत्रणा, पतंजली, आर्ट ऑफ लिव्हींग, विद्या
भारती, भारत स्वाभिमान, नेहरु युवा केंद्र, भारत स्काऊट आणि गाईड, राष्ट्रीय सेवा योजना,
योगाचा प्रचार प्रसार करणाऱ्या संस्था तसेच योगपटू सहभागी होणार आहे.
सभेला शिक्षणाधिकारी तानाजी नरळे, जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ. अविनाश आहेर, शासकीय तंत्र निकेतन विद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय मानकर,
योगा शिक्षक रामभाऊ छापरवार, दिलीप जोशी, दिपा वानखडे, गजानन धर्माळे, पुष्पलता अफुणे,
इंदिरा उजळे, विजय चव्हाण, गजानन डाबेराव, निलेश कापसे, शंकरजी उजळे, डॉ. अर्चना मेहकरकर,
संजय लहाने, तालुका क्रीडा अधिकारी चंद्रकांत उपलवार, जानकी कुलकर्णी, क्रीडा अधिकारी
संजय पांडे, मिलींद काटोलकर, पांडूरंग महाले, शिवशंकर भोयर, शंकर ठाकरे, अर्जुन जाधव,
सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व गटशिक्षणाधिकारी, स्काऊट जिल्हा संघटक राजेश गावंडे,
गाईड जिल्हा संघटक प्रिती गोल्हर, नेहरु युवा केंद्राचे समन्वयक ओमप्रकाश यांची उपस्थिती
होती.
*******
Comments
Post a Comment