योग जीवनाचा अविभाज्य भाग - हृषीकेश मोडक 5 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा







वाशिम, दि. 21 : आजच्या धकाधकीच्या व्यस्त जीवनात तंदुरुस्त राहण्यासाठी काही जण जीममध्ये जातात. कुणी धावतात तर कुणी व्यायाम करतात. प्रत्येक भारतीयाने शारिरिकदृष्टया तंदुरुस्त राहून मानसिकदृष्टया सक्षम झाले पाहिजे. संपन्न आयुष्य जगण्यासाठी योग महत्वाचा असून योग हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक  यांनी केले.
      आज 21 जून रोजी वाशिम येथील वाटाणे लॉनमध्ये 5 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रमाचे आयोजन आयुष मंत्रालय, भारत सरकार, महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त वतीने करण्यात आले. मुख्य अतिथी म्हणून जिल्हाधिकारी मोडक यावेळी बोलत होते. मंचावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, पोलीस अधिक्षक वसंत परदेशी, पतंजलीचे डॉ. भगवंतराव वानखेडे, आर्ट ऑफ लिव्हींगचे डॉ. हरीष बाहेती, विद्याभारतीचे दिलीप जोशी, स्वामी सत्यानंद योग केंद्राचे राम छापरवाल, वाशिम नगर परिषदेचे मुख्याधिकारी वसंत इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती.
      श्री. मोडक पुढे म्हणाले, भारतीय संस्कृतीत योगाला महत्व आहे. प्रत्येकाने सुखी संपन्न निरोगी आयुष्य जगण्यासाठी योग केले पाहिजे. योग केवळ योग दिवस आहे म्हणून करता तो दररोज नियमितपणे केला पाहिजे, असे सांगितले.
      योग दिनाचे औचित्य साधून डॉ. भगवंतराव वानखेडे, विजय चव्हाण आणि दीपा वानखेडे यांनी उपस्थित योगसाधकांना योगमुद्रा, ध्यानमुद्रा, वक्रासन, वज्रासन, उत्तानपादासन, पवनमुक्तासन, कपालभारती, प्राणायाम, भद्रासन यासह विविध योग शिकविले. शौर्य वानखडे या बालकाने देखील विविध प्रकारचे योग करुन उपस्थित योग साधकांकडून प्रशंसा मिळविली.
      पतंजली योग समिती, आर्ट ऑफ लिव्हिंग, विद्याभारती, स्वामी सत्यानंद योग केंद्र, भारत स्वाभिमान, भारत स्काऊट गाईड, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, लॉयन्स क्लब, नेहरु युवा केंद्र, व्यंकटेश योग अभ्यास मंडळाचे पदाधिकारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले. योगसाधक म्हणून विविध क्षेत्रातील व्यक्ती, विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
      यावेळी 20 जून रोजी पतंजली परिवार आणि आर्ट ऑफ लिव्हींग परिवाराच्या वतीने माँ गंगा मेमोरिअम ट्रस्टच्या श्री.श्री. रवीशंकर हॉलमध्ये रांगोळी स्पर्धेतील विजेते प्रतिक्षा वानखेडे, भारती गटलेवार, सायली जहागीरदार, प्रियंका गोळे, राजेश खंडाळकर यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
      प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत वृक्षाचे रोपटे भेट देवून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी तानाजी नरळे यांनी केले. संचालन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदिप शेटिये यांनी केले. उपस्थितांचे आभार क्रीडा अधिकारी श्री. उप्पलवार यांनी मानले. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली.
                                                                             *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश