आदिवासी शेतकऱ्यांना अनुदानावर मिळणार तुषार संच


·        २९ जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

वाशिम, दि. १३ : केंद्रवर्ती अर्थसंकल्पमध्ये न्युक्लिअस बजेट योजनेअंतर्गत वनहक्क कायद्यांतर्गत जमीन प्राप्त झालेल्या आदिवासी लाभार्थ्यांना व सर्वसाधारण आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना ८५ टक्के अनुदानावर तुषार संच पुरवठा करण्याची योजना मंजूर झाली आहे. अकोला, वाशिम व बुलडाणा या तीन जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तरी अनुसूचित जमातीमधील इच्छुक शेतकरी लाभार्थ्यांनी १५ ते २९ जून २०१९ या कालावधीत विहित नमुन्यातील अर्ज अकोला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सादर करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.
लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा शेतकरी असावा. त्याच्याकडे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अपंग, विधवा, परित्यक्ता लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. लाभार्थ्याकडे दारिद्य्ररेषेचे कार्ड किंवा राशन कार्ड असणे आवश्यक आहे. अर्जासोबत रहिवाशी दाखला, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, जमीन धारणेचा सातबारा दाखला, आधारकार्ड जोडणे आवश्यक आहे. वैयक्तिक वनहक्क पट्टेधारक लाभार्थींना (आयएफआर होल्डर) प्राधान्य देण्यात येईल. या योजनेचा लाभ जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, कृषि विभागाकडून न मिळाल्याबाबतचे हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे. पाण्याचे स्त्रोत विहीर, नाला, नदी असणे आवश्यक आहे. पाणी उपशाची साधने तेलपंप, वीजपंप असणे आवश्यक आहे. कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीस या योजनेचा लाभ देण्यात येईल व लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांच्या सातबारा दाखल्यावर त्याबाबतची नोंद घेण्यात येईल. यापूर्वी लाभ घेण्यात आलेल्या व्यक्तीला सदर योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
अर्जाचा विहित नमुना अकोला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात उपलब्ध आहे. तरी पात्र व इच्छुक लाभार्थ्यांनी १५ जून ते २९ जून २०१९ या कालावधीत कार्यालयातून अर्जाचा नमुना प्राप्त करून घ्यावा व याच कालावधीत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश