महाडीबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यास ३० जूनपर्यंत मुदतवाढ
वाशिम, दि. ११ : राज्य शासनामार्फत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी डीबीटी पोर्टल
१ ऑक्टोंबर २०१८ पासून नव्याने सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार माहिती व
तंत्रज्ञान विभागाचे संचालक यांनी तयार केलेल्या https://mahadbtmahait.gov.in
या संकेतस्थळावरून मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी
व इतर योजना ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. महाडीबीटी पोर्टलवर २१ मार्च २०१९ पर्यंत
विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी आणि महाविद्यालयांना अर्जांवर कार्यवाही
करण्यासाठी वेळ देण्यात आली होती. आता ही मुदत ३० जून २०१९ पर्यंत वाढविण्यात आली
आहे.
वाढीव मुदतीत https://mahadbtmahait.gov.in
या संकेतस्थळावरील विजाभज, इमाव, विमाप्र तसेच अनुसूचित जाती
प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी व इतर योजनांचे अर्ज
भरण्यापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना आणि महाविद्यालय स्तरावरील ऑनलाईन
झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रलंबित पात्र अर्ज तत्काळ विनाविलंब निकाली काढता
येतील. ही अंतिम मुदतवाढ असून ३० जून २०१९ नंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही. पात्र
विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित
प्राचार्य, मुख्याध्यापक यांची राहील, असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांनी कळविले
आहे.
*****
Comments
Post a Comment