जवाहर नवोदय विद्यालयात ‘डिजिटल क्लास रूम’चे उदघाटन



वाशिम, दि. १७ :  येथील जवाहर नवोदय विद्यालयामध्ये तयार करण्यात आलेल्या चार डिजिटल क्लास रूम व सीसीटीव्ही यंत्रणेचे उदघाटन खासदार भावना गवळी व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार भावना गवळी यांच्या खासदार निधीमधून डिजिटल क्लास रूम व सीसीटीव्ही बसविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
यावेळी विद्यालय सल्लागार समिती व विद्यालय व्यवस्थापन समितीचे सदस्य जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नसिरुद्दीन पटेल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. गाडेकर, राजस्थान आर्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलनकुमार संचेती, शिक्षक-पालक समितीचे सदस्य उध्दव काळे व श्रीमती जयश्री सुतवणे उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार गवळी म्हणाल्या की, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे काम जवाहर नवोदय विद्यालयाच्या माध्यमातून होत आहे. या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांकरिता जास्तीत जास्त शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. आज डिजिटल क्लास रूम संकल्पनेतून विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान उपलब्ध होत असून जवाहर नवोदय विद्यालयात सुरु झालेल्या या सुविधेचा सर्व विद्यार्थ्यांना फायदा होईल. या विद्यालयाला जल शुद्धीकरण यंत्र व सोलर यंत्रणा बसविण्यासह इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

सर्वप्रथम जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आर. एस. चंदनशिव यांनी प्रास्ताविकामध्ये डिजिटल क्लास रूमविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या चित्रांच्या प्रदर्शनालाही खासदार गवळी व जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी भेट दिली. आभार प्रदर्शन उपप्राचार्य श्रीमती एस. डी. साखरे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे