जिल्हा वार्षिक योजनेतील निधी खर्चाचा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी घेतला आढावा
·
निधी मागणी प्रस्ताव
तातडीने सादर करण्याचे निर्देश
·
विशेष घटक योजनेच्या
निधीसाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना
वाशिम, दि. २१ : जिल्हा वार्षिक योजना २०१६-१७ अंतर्गत झालेल्या निधी खर्चाचा आढावा
घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी आढावा
बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा वार्षिक योजना
(सर्वसाधारण), अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी विकास योजना अंतर्गत प्राप्त निधी
व खर्च झालेल्या निधीचा यंत्रणानिहाय आढावा घेतला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश
पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे
प्रकल्प संचालक के. एम. अहमद, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, समाज कल्याण विभागाचे
सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर, एकात्मिक आदिवासी प्रकल्पच्या अधिकारी श्रीमती वनिता
सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नसिरुद्दीन पटेल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
दत्तात्रय गावसाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे, महेश पाटील, जिल्हा
पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सोनोणे, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्यासह सर्व अंमलबजावणी यंत्रणांचे अधिकारी उपस्थित
होते.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी म्हणाले की, जिल्हा
वार्षिक योजनेमधील खर्चाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न
करावेत. प्रस्तावित केलेल्या कामांकरिता निधी मागणीसाठी तातडीने परिपूर्ण प्रस्ताव
सादर करून निधी प्राप्त करून घ्यावा. विशेष घटक योजनेमध्ये अर्थसंकल्पित केलेला
पूर्ण निधी अद्यापही काही यंत्रांना प्राप्त झालेला नाही. यासाठी संबंधित
यंत्रणांनी आपल्या विभागाकडे मंत्रालयस्तरावर पाठपुरावा करावा. त्यासाठी आवश्यक
पाठपुरावा करून हा निधी प्राप्त करून घ्यावा व निधी तातडीने खर्च करण्यासाठी योग्य
ती कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिल्या.
सन २०१७-१८ करिता निधी खर्चाच्या नियोजनाचे प्रस्ताव
सादर करण्याबाबत सर्व यंत्रणांना कळविण्यात आले आहे. मात्र अद्यापही अनेक
यंत्रणांचे प्रस्ताव अप्राप्त आहेत. सर्व यंत्रणांनी तातडीने हे प्रस्ताव सादर
करावेत. अन्यथा पुढील वर्षाकरिता कोणतीही आर्थिक तरतूद ठेवली जाणार नाही, असे
जिल्ह्याधिकाऱ्यांनी बजावले. प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी यांनी
जिल्हा वार्षिक योजनेतील प्राप्त निधी व आतापर्यंत झालेल्या खर्चाची यंत्रणानिहाय
आकडेवारी मांडली.
Comments
Post a Comment