यशोगाथा... लोकसहभागातून साकारली जलसमृद्धी




·                   शेलूबाजारमधील नागरिकांची किमया
·                   अडाण नदी खोलीकारणामुळे गाव टंचाईमुक्त
मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार हे जिल्ह्यातील मोठी बाजार पेठ म्हणून ओळखले जाणारे गाव. मात्र गेल्या काही वर्षांपासून पाणी टंचाईच्या समस्येने या गावाला त्रस्त केले होते. गतवर्षीच्या उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठीही गावकऱ्यांना वणवण करावी लागली. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी गावकरी एकत्र आले आणि गावाच्या बाजूने वाहणाऱ्या अडाण नदीच्या खोलीकारणाचा विषय ऐरणीवर आला.
शेलूबाजार गावाच्या बाजूने वाहणाऱ्या या अडाण नदीपात्रात गाळ जमा होऊन तिचे पात्र उथळ बनले होते. त्यामुळे पावसाळ्यात ओसंडून वाहणारी, प्रसंगी आजूबाजूच्या सुमारे २५० हेक्टर जमिनीवरील पिकेही आपल्या पाण्याबरोबर घेऊन जाणारी ही नदी डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यातच कोरडी पडत होती. त्यामुळे नदी काठी वसलेल्या या गावाला प्रत्येक उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. या टंचाईवर मात करण्यासाठी अडाण नदीच्या पत्रातील गाळ उपसणे हा पर्याय समोर आला. वारंवार पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या गावकऱ्यांनी एकत्रित येऊन लोकसहभागातून नदीमधील गाळ उपसण्याचा निर्धार केला. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार एक हजार ते अकरा हजार रुपयांपर्यंत वर्गणी जमा केली.
गावामधील व्यापारी, व्यावसायिक, नोकरदारांपासून ते सर्वसामान्य महिलांपर्यंत प्रत्येकाने आपला वाटा उचलला. यामधून सुमारे १३ लक्ष रुपये लोकवर्गणी जमा झाली. काम सुरु करण्यापूर्वी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. त्यानंतर दिनांक १५ एप्रिल २०१६ रोजी, रामनवमी दिवशी प्रत्यक्ष अडाण नदीमधील गाळ उपसण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. तीन पोकलँड व सुमारे दीडशे ट्रॅक्टरच्या सहाय्याने गाळ उपसा सुरु झाला. शेतकऱ्यांनी नदी पात्रातील सुपीक गाळ स्वखर्चाने वाहतूक करून आपल्या शेतामध्ये टाकला. लोकवर्गणीतून जमा झालेल्या १३ लक्ष रुपयांमधून अडाण नदीचे सुमारे ४०० मीटर लांब पात्रामधील गाळ उपसून त्याची रुंदी ३५ मीटर पर्यंत तर खोली ३ मीटर करण्यात आली.
पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या कामाची पाहणी केली. शेलूबाजारमधील ग्रामस्थांनी केलेल्या या कामाचे कौतुक करत त्यांनी तातडीने ‘सीएसआर’ फंडातून १९ लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून गावकऱ्यांनी ८०० मीटर लांब नदीपात्राचे खोलीकरण व रुंदीकरण केले. लोकसहभाग व सीएसआर फंडातून एकूण १२०० मीटर लांब नदीपात्राचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम करण्यात आले आहे. नदीपात्रात पाणी साठून रहावे, याकरिता या १२०० मीटरमध्ये सहा डोह निर्माण करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा पावसाळा सुरु झाल्यानंतर काही दिवसांतच नदीपात्रात पाणी जमा झाले होते. तसेच या डोहांमुळे पावसाचे पाणी जमिनीत जिरल्यामुळे विहिरी व बोअरवेलची पातळी झपाट्याने वाढली असून खरीप व रब्बी हंगामातही पिकांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल : सरपंच सुनिता कोठाळे
गतवर्षी उन्हाळ्यामध्ये शेलूबाजार मध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनला होता. पाणी टंचाईमुळे १० ते १२ दिवसानंतर पिण्याचे पाणी सोडण्यात येत होते. मात्र यंदा अडाण नदीच्या खोलीकारणामुळे शेलूबाजार गावासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. नदी खोलीकारणामुळे पुढील वर्षी उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईची समस्या शेलूबाजारमधील ग्रामस्थांना भेडसावणार नाही. तसेच ईचा, चिखली व शेलूबाजार गावांमधील शेतकऱ्यांच्या विहिरी व विंधन विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने खरीप व रब्बी पिकांसाठी सिंचनाची सोय उपलब्ध होईल, असे मत शेलूबाजारच्या सरपंच सुनिता पांडुरंग कोठाळे यांनी व्यक्त केले.
-         राजू जाधव,
जिल्हा माहिती कार्यालय, वाशिम

*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे