'चाइल्ड लाइन'च्या मदतीने सापडला परराज्यात हरविलेला मुलगा!

वाशिम, दि. १७ :  तालुक्यातील सुकळी येथील ११ वर्षीय मुलगा (बालसंरक्षण कायद्यातील तरतुदीमुळे बालकाचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे.) वडिलांसोबत रेल्वेने प्रवास करीत असताना थेट छत्तीसगड राज्यातील दुर्ग या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या रेल्वे स्टेशनवर पोहोचला. दरम्यान, या मुलाला वाशिम जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या प्रयत्नाने व दुर्ग जिल्ह्यातील 'चाइल्ड लाइन'च्या मदतीने वाशिम येथे सुखरूप आणण्यात येऊन कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. 
यासंदर्भात अधिक माहिती देताना जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुभाष राठोड यांनी सांगितले, की हरविलेला ११ वर्षीय मुलगा दुर्ग रेल्वे स्टेशनवर पोहोचला, तेव्हा तेथे तैनात रेल्वे पोलिसांनी त्याची विचारपूस करून त्याला केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाचा उपक्रम असलेल्या 'चाइल्ड लाइन' संस्थेच्या दुर्ग येथील अधिकार्‍यांच्या ताब्यात दिले. दुर्ग येथील 'चाइल्ड लाइन'मार्फत संबंधित मुलाची माहिती वाशिम जिल्हा बाल संरक्षण कक्षाला देण्यात आली. त्यानंतर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली संरक्षण अधिकारी राहुल गवई यांनी त्या मुलाच्या कुटुंबाचा शोध घेऊन त्यांच्याविषयीची सर्व माहिती व आवश्यक कागदपत्रे गोळा केली. या माहितीच्या आधारे छत्तीसगड राज्याच्या दुर्ग जिल्ह्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, चाइल्ड लाइन संस्था, बाल कल्याण समिती, बालगृह यांच्याशी वारंवार संपर्क साधून पाठपुरावा करण्यात आला व मुलाची कुटुंबामध्ये पुनस्र्थापना करण्याची विनंती केली. दुर्ग जिल्हा बाल कल्याण समितीने संबंधित मुलाला वाशिम बालकल्याण समितीच्या ताब्यात दिले. १५ सप्टेंबर रोजी या मुलाला नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. 'चाइल्ड लाइन'मुळे हरविलेल्या मुलाचा शोध घेणे शक्य झाले. तथापि, यासाठी १0९८ ही टोल फ्री हेल्पलाइन असून, त्याचा बाधितांनी लाभ घ्यावा, असे आवाहनजिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुभाष राठोड यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे