‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत शौचालय उभारणीला गती द्या - खासदार भावनाताई गवळी


        वाशिम, दि. ०४ : जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना वैयक्तिक शौचालय बांधणीसाठी प्रोत्साहित करून ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत शौचालय उभारणीस गती देण्याचे निर्देश खासदार भावनाताई गवळी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या सभेत त्या बोलत होत्या.
            याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यपालन अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक के. एम. अहमद यांच्यासह वाशिम पंचायत समितीचे सभापती गजानन भोने, मालेगाव नगरपंचायतच्या सभापती मीनाक्षी सावंत, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, योगेश जवादे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. गाडेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा कृषी अधिकारी आबासाहेब धापते, प्रा. पंढरीनाथ चोपडे यांच्यासह सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, नगरपरिषद व नगरपंचायत मुख्याधिकारी आणि इतर विभाग प्रमुख उपस्थित होते.
            खा. गवळी म्हणाल्या की, स्वच्छ भारत मिशन हा केंद्र सरकारचा अतिशय महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. जिल्ह्यातील सर्व शहरे व गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी गतिमान प्रयत्न होणे आवश्यक आहे. याकरिता सर्व नगरपरिषदा व ग्रामपंचायत क्षेत्रात स्वच्छतेविषयी व्यापक जनजागृती करून लोकांना शौचालय बांधण्यासाठी व त्याच्या वापरासाठी प्रोत्साहित करण्यात यावे. यावर्षी हागणदारीमुक्त गावांच्या वार्षिक कृती आराखडा (एआयपी) मध्ये समाविष्ट नसलेल्या गावांमध्येही वैयक्तिक शौचालय बांधणीसाठी प्रयत्न करण्यात यावा. या गावांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजणा (मनरेगा) मधून शौचालयाचे बांधकाम करता येणे शक्य आहे. त्यासाठी अशा ग्रामपंचायतींमध्ये येत्या २ ऑक्टोंबरच्या ग्रामसभेत शौचालय बांधकामासाठीचा आराखडा मंजूर करून घेण्याबाबत सर्व ग्रामसेवकांना कळविण्याच्या सूचना खा. गवळी यांनी यावेळी दिल्या.
            जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख म्हणाल्या की, स्वच्छतेसाठी शौचालयाबरोबरच सांडपाण्यासाठी शोषखड्डे घेण्याबाबत सुध्दा जागृती करणे गरजेचे आहे. शोषखड्डे व एआयपीमध्ये समाविष्ट नसलेल्या गावांमध्ये वैयक्तिक शौचालय बांधकाम मनरेगामधून करण्याबाबत आराखडा तयार करण्यासाठी सर्व गट विकास अधिकारी व ग्रामसेवक यांची बैठक घेऊन मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी त्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे. तसेच जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये गुड मॉर्निंग पथक सुरु करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
            जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा मार्च २०१७ पर्यंत पूर्णतः हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाने दिले आहे. त्यामुळे सर्व नगरपरिषद प्रशासनांनी वैयक्तिक शौचालय बांधणीच्या कामाला प्राधान्य द्यावे. डिसेंबर २०१६ अखेरपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये चारही नगरपरिषद क्षेत्रांमध्ये १०० टक्के वैयक्तिक शौचालय उभारणी होणे आवश्यक आहे. याकरिता सर्व मुख्याधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या मदतीने प्रभागनिहाय कुटुंबांना भेटी देऊन लोकांना स्वच्छता व शौचालयाचे महत्त्व पटवून देऊन शौचालय बांधण्याचे आवाहन करावे.
            या बैठकीमध्ये राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम, ग्रामीण पाणी पुरवठा योजना, भूमी अभिलेख्यांचे संगणकीकरण, दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना, कृषी विभागाच्या विविध योजना, सर्व शिक्षा अभियान, एकात्मिक बालविकास प्रकल्प, एकात्मिक आदिवासी विकास योजनासह इतर योजनांचा आढावा घेण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे