उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सहकार्य करा - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी


·         कायदा व सुव्यवस्था विषयक आढावा बैठक
वाशिम, दि. ०३ दिनांक ५ सप्टेंबरपासून सुरु होत असलेला गणेशोत्सव तसेच बकरी ईद या उत्सवांच्या काळात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कायम रहावी, यासाठी सर्वधर्मीय नागरिकांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले. गणेशोत्सव व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आयोजित कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी म्हणाले की, गणेशोत्सव व बकरी ईद हे दोन्ही धार्मिक सण शांततेत साजरे करून त्यांचे पावित्र्य अबाधित राखण्याची जबाबदार सर्वधर्मीय नागरिकांची आहे. या काळात कोणत्याही गैरकृत्यांना थारा देऊ नका. तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहचवणारे कृत्य आजूबाजूला घडू नये, यासाठी गणेशोत्सव मंडळे, शांतता समिती व मोहल्ला कमिटी यांनी सतर्क रहावे. गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर असलेले खड्डे संबंधित नगरपरिषद व ग्राम पंचायतींनी तातडीने भरून घ्यावेत. तसेच या मार्गावर विद्युत दिवे बसवून घेण्यात यावेत. तीनही नगरपालिका क्षेत्रामधील विसर्जन मिरवणूक मार्ग व इतर संवेदनशिल ठिकाणी नगरपरिषदांनी सीसीटीव्ही कॅमेरा बसवावेत. तसेच तसेच गणेशोत्सव मंडळांनीही आपल्या मंडपमध्ये सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
गणेश विसर्जन मिरवणूक व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी प्रशासनाला सहकार्य करावे. याकाळात विसर्जन मिरवणूक मार्गावर होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रत्येक मंडळानी दिलेल्या वेळेवर मिरवणूक काढावी. गणेश विसर्जनाची मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी महसूल विभाग, पोलीस व इतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी विसर्जन मार्गाची संयुक्त पाहणी करून योग्य ती कार्यवाही करावी. तसेच हिंदू व मुस्लीम बांधवांचे सण एकाच कालावधीत आले असल्याने दोन्ही समाजबांधवांनी एकमेकांच्या धार्मिक भावनांचा आदर करून हे उत्सव शांतते साजरे करावेत, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी केले.
या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, डॉ. संदीप सानप, डॉ. शरद जावळे यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, शांतता समिती व मोहल्ला कमिटीचे सदस्य, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सवात सामाजिक जागृतीसाठी प्रयत्न व्हावेत-जिल्हाधिकारी
गणेशोत्सवाचा मूळ उद्देश हा सामाजिक जागृती असून या उद्देशाला अनुसरुन उत्सव साजरा केला जावा. याकाळात जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांनी स्त्रीभ्रूण हत्या रोखणे, जलसंवर्धन, साक्षरता, मतदार जनजागृती व बेटी बचाओ, बेटी पढाओ यासारख्या सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करणारे देखावे, सजावट करावी. तसेच राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या लोकमान्य सार्वजनिक गणेश अभियानात जिल्ह्यातील जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे. या अभियानात सहभागी होण्याची अंतिम तारीख ४ सप्टेंबर २०१६ असून याकरिता संबंधित तालुक्याच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यावेळी केले. तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांचेमार्फत सुध्दा सामाजिक विषयावर देखावे, सजावट करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्वस्त दरात विद्युत पुरवठा
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तात्पुरत्या स्वरुपात वीज जोडणी देण्यात येणार आहे. याकरिता घरगुती वीज दरापेक्षा कमी दराने बिलाची आकारणी होईल. त्यामुळे सर्व सार्वजनिक मंडळानी महावितरण कडून अधिकृत तात्पुरत्या स्वरूपातील वीज जोडणी घ्यावी. याकरिता महावितरणाच्या शाखा कार्यालयात अर्ज सादर करावेत. या अर्जासोबत नगरपरिषद अथवा ग्रामपंचायत व विद्युत निरीक्षक यांची परवानगी असणे आवश्यक आहे. कोणत्याही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने अवैधरित्या वीज जोडणी घेऊ नये, असे आवाहन महावितरणचे कार्यकारी अधियांता अतुल देवकर यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे