‘मुद्रा बँक’च्या प्रसार, प्रसिद्धीसाठी विविध उपक्रम राबवा - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी
·
प्रत्येक बँकांना
उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश
·
कार्यशाळांचे आयोजन
करण्याच्या सूचना
वाशिम, दि. ०३ : मुद्रा बँक योजनेविषयी जिल्हाभर प्रसार, प्रसिद्धी
होणे आवश्यक असून या योजनेविषयी मार्गदर्शन सखोल करण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन
तसेच विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या मुद्रा बँक योजना समन्वय समितीच्या बैठकीत ते
बोलत होते.
याप्रसंगी
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक के. एम. अहमद, जिल्हा नियोजन
अधिकारी सुरेंद्र गवळी, जिल्हा अग्रणी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक एस.
एस. मेहता, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक संचालक वि.
कृ. माळी, जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक ए. वाय. बनसोड, औद्योगिक
प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य ए. आर. दुर्गे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी
श्री. द्विवेदी म्हणाले की, होतकरू,
बेरोजगार यांना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मुद्रा बँक योजनेच्या माध्यमातून
अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी ही योजना अतिशय
उपयुक्त असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचणे
आवश्यक आहे. या अनुषंगाने जिल्हा अग्रणी बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यात
कार्यशाळांचे आयोजन करून युवकांना या योजनेविषयी माहिती देण्यात यावी. या कार्यशाळेकरिता
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व जिल्हा ग्रामीण
स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था यांचे सहकार्य घेण्यात यावे.
जिल्हा माहिती अधिकारी यांनी वृत्तपत्रे व इतर
माध्यमातून मुद्रा बँक योजनेविषयी प्रसिद्धी करावी. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक
बँकेला देण्यात आलेले मुद्रा बँक योजनेचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी जिल्हा अग्रणी
बँकेचे व्यवस्थापक यांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी
दिल्या. सर्वप्रथम जिल्हा नियोजन अधिकारी तथा समितीचे समन्वयक सुरेंद्र गवळी यांनी
समितीच्या कार्यपद्धतीविषयी माहिती दिली. यावेळी मुद्रा बँक योजनेच्या अनुषंगाने
विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.
Comments
Post a Comment