शासकीय योजनांचा लाभ घेऊन गावाचा विकास साधा -जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख
·
वांगी येथे
‘संवादपर्व’ कार्यक्रमाचे आयोजन
·
शासकीय योजनांविषयी
मार्गदर्शन
·
कलापथकाच्या माध्यमातून
समाजप्रबोधन
वाशिम, दि. १४ : वैयक्तिक व
सार्वजनिक लाभासाठी राबविण्यात येत असलेल्या शासकीय योजनांचा प्रत्येकाने लाभ घेऊन
गावाचा विकास साधण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा
देशमुख यांनी केले. वाशिम तालुक्यातील वांगी येथील दंडेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव
मंडळ येथे वाशिम जिल्हा माहिती कार्यालय आणि वाशिम जिल्हा परिषदेच्या पाणी व
स्वच्छता विभागाच्यावतीने आयोजित ‘संवादपर्व’ कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या.
याप्रसंगी सरपंच सविता भोयर, जिल्हा
परिषदेचा स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, नगरपरिषद
प्रशासन अधिकारी दीपक मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप देशमुख, जिल्हा माहिती
कार्यालयाचे तानाजी घोलप, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे राजू सरतापे, राम
शृंगारे, पोलीस पाटील माधव भोयर, श्री. उदगीरे आदी उपस्थित होते. यावेळी रामचंद्र बहुद्देशीय
संस्थेचे शाहीर मधुकर गायकवाड व सुशीलाबाई घुगे यांनी कलापथकाच्या माध्यमातून
विविध योजनांची माहिती सादर केली.
जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. देशमुख
म्हणाल्या की, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांनी एकत्रित येऊन प्रयत्न
करणे आवश्यक आहे. शेती व ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासकीय स्तरावरून विविध
योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ घेऊन गावाचा कायापालट करण्यासाठी
ग्रामस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. वांगी येथे एक गाव, एक गणपती उपक्रम राबविल्याबद्दल
त्यांनी गावकऱ्यांचे अभिनंदन केले.
गावामध्ये स्वच्छता असेल तर गावातील
नागरिकांचे आरोग्य चांगले राहते व गावाच्या प्रगतीला हातभार लागतो. गावात स्वच्छता
येण्यासाठी प्रत्येक घरामध्ये शौचालयाची उभारणी करून त्याचा वापर होणे आवश्यक आहे.
त्यामुळे श्री गणेशाच्या साक्षीने सर्वांनी शौचालय उभारण्याचा संकल्प करण्याचे
आवाहान सौ. देशमुख यांनी केले. तसेच पुढील गणेशोत्सवापर्यंत वांगी गाव
हागणदारीमुक्त, स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन
प्रयत्न करावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी
महेश पाटील म्हणाले की, जिल्ह्यात शौचालय उभारणीच्या कामाला गती आलेली आहे. सुमारे
६४ गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. वांगी येथील ग्रामस्थांनीही गाव हागणदारीमुक्त
करण्यासाठी पुढाकार घ्यावा. गावातील प्रत्येक कुटुंबाने वैयक्तिक शौचालय उभारून
त्याचा वापर सुरु करावा.
जिल्हा माहिती कार्यालयाचे तानाजी
घोलप यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले की, शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत
पोहोचविण्यासाठी राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘संवादपर्व’
हा उपक्रम राबविला जात आहे. त्यामुळे नागरिकांना शासकीय योजनांची सविस्तर माहिती
मिळण्यास मदत होईल, हा उपक्रमाचा उद्देश आहे. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा पाणी
व स्वच्छता विभागाचे राजू सरतापे यांनी केले.
‘संवादपर्व’ उपक्रमामुळे योजनांचा
प्रसार होईल
महाराष्ट्र शासनाच्या माहिती
व जनसंपर्क विभागामार्फत राबविण्यात येत असलेला ‘संवादपर्व’ उपक्रम कौतुकास्पद
असून या उपक्रमाच्या माध्यमातून शासकीय योजनांचा प्रसार होण्यास मदत होईल. तसेच
लोकांपर्यंत योजनांची माहिती पोहचून या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत
होईल, असे मत जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी व्यक्त केले.
‘संडास बांधा ना धनी, आपल्या
घरी...!’
रामचंद्र बहुद्देशीय संस्थेचे
शाहीर मधुकर गायकवाड व सुशीलाबाई घुगे यांनी ‘संवादपर्व’उपक्रमात कलापथकाच्या
माध्यमातून विविध योजनांची माहिती सादर केली. त्यांना राजरत्न अंभोरे, सुभाष पडघान
व रुखमाबाई सावंत यांनी साथ दिली. ‘संडास बांधा ना धनी, आपल्या घरी...’ या गीताच्या
माध्यमातून त्यांनी उपस्थितांना शौचालय उभारणीचे आवाहन केले. मुलीला जन्म घेऊ
द्या, तिला उच्च शिक्षित बनवा, असे आवाहन करीत ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश
दिला. जलयुक्त शिवार अभियान, अनुदानावर कृषी अवजारांचा पुरवठा, मागासवर्गीय
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, कुटुंब कल्याण योजनासह इतर शासकीय योजांची माहिती
यावेळी गीताद्वारे दिली. तसेच व्यसनमुक्त बना, लग्नावर लाखो रुपये खर्च न करता
साधे लग्न किंवा सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न करण्याचे आवाहनही शाहीर गायकवाड व
सुशीलाबाई घुगे यांनी यावेळी केले.
*****
Comments
Post a Comment