गणेशोत्सवसाठी पोलीस यंत्रणा सज्ज -जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर
·
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
·
संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही लावणार
वाशिम, दि. ०६ : जिल्ह्यात गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून याकालावधीत कोणताही अनुचित
प्रकार घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्था कायम रहावी, यासाठी जिल्हा पोलीस यंत्रणा
सज्ज झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी दिली. जिल्हा
पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार बांधवांशी संवाद साधताना ते बोलत होते.
जिल्ह्यात सार्वजनिक
गणेशोत्सव मंडळांमार्फत ६४६ श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली
आहे. यामध्ये शहरी २३८ व ग्रामीण भागातील ४०८ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा समावेश
आहे. तसेच जिल्ह्यात २०९ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबविण्यात असल्याचे
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. होळकर यांनी सांगितले. गणेशोत्सव कालावधीत कायदा व
सुव्यवस्था कायम रहावी, याकरिता शहरी व ग्रामीण भागात चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला
आहे. यासाठी तीन उपविभागीय पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्त्वाखाली ८० पोलीस अधिकारी,
१ हजार ८२ पोलीस कर्मचारी, गृह रक्षक दलाचे ३१३ जवान व राज्य राखीव पोलीस दलाची एक
तुकडी, वरुण वाहन व बॉंब शोध (बीडीडीएस) पथक तैनात करण्यात आलेले आहे. याव्यतिरिक्त
प्रत्येक पोलीस ठाण्याच्या स्तरावर ‘शांतीदूत’ नेमण्यात येणार आहेत. तसेच विसर्जन
मिरवणुकीसाठी अतिरिक्त बंदोबस्ताची मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी
सांगितले.
गणेशोत्सव मंडपाजवळ कोणतेही अवैध धंदे चालविल्यास तसेच
गणेशोत्सव काळात व मिरवणुकीदरम्यान बेकायदेशीर हत्यार बाळगल्यास संबंधितांवर
गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. गणेशोत्सव व मिरवणूक काळात ध्वनीक्षेपकाचा
आवाज ५० डेसिबल पेक्षा जास्त नसावा, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत.
त्यामुळे ध्वनिक्षेपक क्षमता मोजमापासाठी पोलीस ठाण्यांना नॉईस लेवल मीटर देण्यात
आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात
येणार आहे. जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी डॉल्बीमुक्त व
गुलालमुक्त गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहनही जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. होळकर
यांनी यावेळी केले.
विसर्जन
मार्गावर सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना
गणेशोत्सव कालावधीत कायदा व सुव्यवस्था कायम रहावी,
यासाठी १ हजार ३९ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच नगरपरिषद
क्षेत्रात विसर्जन मार्गावर संवेदनशील ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात सीसीटीव्ही
बसविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सर्व नगरपरिषदांच्या
मुख्याधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना
त्यांच्या मंडपामध्ये सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना देण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. होळकर यांनी सांगितले. गणेशोत्सव काळात
कोणताही अनुचित प्रकार घडू नये. तसेच काळात कोणत्याही प्रकारची अफवा पसरवली जाऊ
नये, याकरिता नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनह श्री. होळकर
यांनी यावेळी केले.
विसर्जन मिरवणुका शांततेत पार
पाडण्यासाठी सहकार्य करा
गणेश विसर्जन मिरवणुका जिल्ह्यात दोन टप्प्यात होणार
असून त्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन पोलीस प्रशासनाने केले आहे. यादरम्यान
प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत विशेष पोलीस अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. विसर्जन
मिरवणूक मार्ग व विसर्जनस्थळी विद्युत व्यवस्था करण्याच्या सूचना संबंधित नगरपरिषद
व ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या आहेत. शहरी भागात विसर्जन स्थळी इमर्जन्सी लाईट
व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे पथक ठेवण्याबाबत सर्व नगरपरिषदांच्या
मुख्याधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक
प्रशांत होळकर यांनी सांगितले.
सामाजिक उप्रकम राबविणाऱ्या
गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार
गणेशोत्सव काळात सामाजिक जनजागृती करणारे उपक्रम
राबविणे, गणेशोत्सव व विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना
तालुकास्तरावर प्रथम, द्वितीय, तृत्तीय व दोन उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येणार
आहेत. तसेच यामधून निवडलेल्या पाच मंडळांना जिल्हास्तरावर सन्मानित करण्यात येणार
असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी सांगितले. तसेच राज्य शासनाने
जाहीर केलेल्या लोकमान्य महोत्सव स्पर्धेत सुध्दा जास्तीत जास्त मंडळानी सहभागी
व्हावे. दिनांक ७ सप्टेंबर २०१६ पर्यंत संबंधित गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे नाव
नोंदणी करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यामध्ये सहभागी होवू शकते, असे त्यांनी
यावेळी सांगितले.
Comments
Post a Comment