वाशिम जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात प्रशासन सज्ज; शाळांमध्ये जनजागृती आणि योग प्रशिक्षणावर भर


वाशिम जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात प्रशासन सज्ज; शाळांमध्ये जनजागृती आणि योग प्रशिक्षणावर भर

वाशिम, दि. १३ मे (जिमाका): वाशिम जिल्ह्यात अमली पदार्थांच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.१३ मे रोजी राजे वाकाटक सभागृहात झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी व्यसनांच्या विळख्यात अडकू नये, यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दारू, गुटखा, गांजा, सिगारेट यांसारख्या हानिकारक पदार्थांपासून दूर राहण्याचे  आवाहन यावेळी त्यांनी केले आहे.

या महत्त्वपूर्ण उपक्रमाच्या वेळी सामाजिक न्यायाचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ व अँटी नारकोटिक्स विभागाचे रामकृष्ण महल्ले यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस  म्हणाल्या, आजची तरुण पिढी ही आपल्या देशाचे भविष्य आहे. त्यांना व्यसनांच्या दलदलीत ढकलणे अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे, प्रशासनाने आता कंबर कसली असून, जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना व्यसनांचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात येतील.

या जनजागृती मोहिमेअंतर्गत शाळा-महाविद्यालयांमध्ये विशेष व्याख्याने, कार्यशाळा आणि माहिती सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांना व्यसनांमुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक नुकसान याबद्दल सखोल माहिती दिली जाईल. तसेच, व्यसनांच्या आहारी गेलेल्या व्यक्तींना योग्य मार्गदर्शन आणि समुपदेशन देण्यासाठी विशेष केंद्रे स्थापन करण्याची योजना आहे.

याव्यतिरिक्त, जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन आणि निरोगी जीवनशैली रुजवण्यासाठी योगासनांचे प्रशिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती लाभते, तसेच नकारात्मक विचार दूर होतात, असा विश्वास जिल्हाधिकारी बुवनेश्वरी  एस यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील शिक्षक, पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांना या महत्त्वपूर्ण कार्यात सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. "सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच आपण आपल्या युवा पिढीला व्यसनांच्या चंगुल्यातून वाचवू शकतो, असे त्या म्हणाल्या.


जिल्हा प्रशासनाच्या या सक्रिय भूमिकेमुळे वाशिम जिल्ह्यातील तरुण पिढीला एक सुरक्षित आणि आरोग्यदायी भविष्य लाभेल, अशी आशा व्यक्त होत आहे. बैठकीत विविध यंत्रणा प्रमुखांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर