जिल्हयात मतदार जनजागृतीसाठी प्रसार माध्यमांची भूमिका महत्त्वाची बुवनेश्वरी एस. जिल्हाधिकाऱ्यांनी साधला पत्रकारांशी संवाद जिल्हयात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी माध्यमांनी सहकार्य करण्याचे आवाहन

जिल्हयात मतदार जनजागृतीसाठी प्रसार माध्यमांची भूमिका महत्त्वाची
  बुवनेश्वरी एस.

जिल्हाधिकाऱ्यांनी साधला पत्रकारांशी संवाद

जिल्हयात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी माध्यमांनी सहकार्य करण्याचे आवाहन

वाशिम, दि. 20 (जिमाका) : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात मतदान जनजागृती आणि जिल्हा प्रशासनाची तयारी या विषयाच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राम लंके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना जिल्हाधिकारी म्हणाल्या, शुक्रवारी 26 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असून शांततेत मतदान पार पडेल या उद्देशाने जिल्हा प्रशासन काम करीत आहे. निवडणूक आयोगाने शेवटच्या मतदारही मतदानापासून वंचित राहणार नाही या उद्देशाने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासन आणि निवडणूक विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहे. 
आपला वाशिम जिल्हा राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत मागे आहे. गेल्या निवडणुकीत ही टक्केवारी फक्त 60 टक्के होती. मात्र यावेळी ही टक्केवारी 75 टक्क्यापर्यंत नेण्याचा प्रशासनाचा मानस आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता जिल्हा प्रशासनाला प्रसिद्धी माध्यमांच्या सहकार्याची नितांत गरज आहे. प्रसारमाध्यमांनी मतदानविषयी जनजागृती करण्यास तसेच प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांना प्रसिद्धी देऊन सहकार्य करावे. असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाल्या, जिल्ह्यातील नवमतदार आणि महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. तरुण पिढीतील युवक युवतींच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदानाविषयी आकर्षण वाढविण्याकरिता वेगवेगळ्या थीमवर रिल्सची स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. यामुळे नवीन पिढीमध्येही या लोकशाही उत्सवाच्या अनुषंगाने जागरूकता निर्माण होईल. असेही श्रीमती बुवनेश्वरी यावेळी म्हणाल्या.
प्रशासनाकडून प्रत्येक गाव, तांडा, वस्ती आणि शहरातील विविध भागांमध्ये मतदार जनजागृती विषयक कार्यक्रम घेण्यात येत आहे. यामध्ये कलापथकांकडून पथनाट्य, एलईडी व्हॅनच्या माध्यमातून ऑडिओ-व्हिडिओ तसेच नगरपरिषदेच्या घंटागाडीच्या माध्यमातून मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. जिल्ह्यात महिलांच्या मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यात महत्वाच्या ठिकाणी जनजागृतीपर बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीपत्रके लावून जनजागृती करण्यात येत आहे. याचबरोबर प्रसार माध्यमांना वेगवेगळया प्रकारचे व्हिडिओज, रील यांचेही वापर करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी नमूद केले.
जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात गृह मतदान पूर्णत्वास येत आहे. वाशिम कारंजा आणि रिसोड या तिन्ही ठिकाणी 90 टक्केच्या वर गृह मतदान करून घेण्यात आले असून यामध्ये दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांनी मोठ्या उत्साहाने मतदान केले आणि या सुविधेच्या उपलब्धतेमुळे आनंद व्यक्त केला आहे. 26 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाच्या अनुषंगाने सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सर्व ठिकाणी पिण्याचे पाणी आणि शेडची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे श्रीमती बुवनेश्वरी यावेळी म्हणाल्या. मतदारांना आपले मतदान केंद्र व मतदान क्रमांक जाणून घेण्यासाठी त्या-त्या मतदारसंघाच्या दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहे. या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क केल्यास मतदारांना त्यांचे बूथ क्रमांक आणि मतदान क्रमांक सांगण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्राची गुगल मॅपवर लोकेशन दाखवण्यात येत आहे. तरी सर्व मतदारांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. मतदानाच्या दिवशी सकाळी लवकर केंद्रांवर जाऊन मतदान करून घ्यावे. असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वर एस. यांनी यावेळी केले. पत्रकार परिषदेस मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.
***

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे