कर्जमाफीसाठी अर्ज सादर करण्यास ५ जून पर्यंत मुदतवाढ


छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
·        योजनेची व्याप्ती वाढली; ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक
वाशिम, दि. २६ : राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असून आता सन २००१ ते २००९ या कालावधीतील कर्ज थकीत असलेल्या मात्र सन २००८ व २००९ मधील कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकरी खातेदारांनाही कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच इमूपालन, शेडनेट, पॉलिहाऊससाठी २००१ ते २०१६ या कालावधीत घेतलेल्या थकीत राहिलेल्या कर्जाचा समावेशही या योजनेत करण्यात आला आहे. कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. ५ जून २०१८ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक असल्याचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
कर्जमाफी योजनेत दि. १  एप्रिल २००१ ते दि. ३१ मार्च २००९ पर्यंत उचल केलेल्या पीक कर्ज किंवा मध्यम मुदत कर्जाची दि. ३० जून २०१६ रोजी थकीत रकमेतून परतफेड केलेली रक्कम वगळून दि. ३१ जुलै २०१७ पर्यंत पीक कर्ज, पुनर्गठन केलेले व मध्यम मुदतीचे मुद्दल व व्याजासह एकूण दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. तसेच दि. १ एप्रिल २००१ ते दि. ३१ मार्च २०१६ पर्यंत इमूपालन, शेडनेट, पॉलिहाऊससाठी मध्यम मुदतीचे कर्ज घेतलेल्या आणि अशा कर्जापैकी दि. ३० जून २०१६ रोजी थकीत झालेल्या रकमेतून परतफेड केलेली रक्कम वगळून दि. ३१ जुलै २०१७ पर्यंतची मुद्दल व व्याजाची थकीत रक्कम दीड लाखाच्या मर्यादेत माफ होणार आहे. या थकबाकीदार शेतकऱ्यांचे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या पूर्वीच्या निकषानुसार सरसकट कर्जमाफी देण्यात येणार आहे. परंतु, याकरिता दि. ५ जून २०१८ पूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक असल्याचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रमेश कटके यांनी कळविले आहे.
अर्जाच्या नमुन्यात बदल नाही, विनाशुल्क अर्ज भरण्याची सुविधा
कर्जमाफीच्या निकषात व अर्जाच्या नमुन्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या अर्जाचे नमुने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, सहाय्यक निबंधक कार्यालय व तहसीलदार कार्यालयांमध्ये तसेच बँकांमध्ये उपलब्ध आहेत.  कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. याकरिता खातेदरांनी आपले आधारकार्ड किंवा आधार नोंदणी केल्याची पोहोच, कर्जखाते पुस्तिका अथवा उतारा व बचत खाते पुस्तिका, पॅनकार्ड (असल्यास), पेन्शन पीपीओ बुक, बँकेचे पासबुक यांची छायांकित प्रत अथवा फोटोकॉपी, कर्जखात्याची माहिती असलेला तपशील असलेली कागदपत्रे घेऊन आपले सरकार सेवा केंद्र अथवा ग्रामपंचायत सेवा केंद्र येथे विनाशुल्क ऑनलाईन अर्ज भरावा. याकरिता शेतकऱ्यांनी मोबाईल क्रमांक नोंदविणे आवश्यक आहे.
*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे