सोयाबीन अनुदानासाठी बँक खात्याची अचूक माहिती सादर करा

·        अचूक माहिती सादर करण्यासाठी चार दिवसांचा कालावधी
वाशिम, दि. २६ : ऑक्टोंबर २०१६ ते डिसेंबर २०१६ या कालावधीत कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान प्रति शेतकरी २५ क्विंटल या मर्यादेत देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार वाशिम जिल्ह्यातील ४४ हजार ६१८ शेतकऱ्यांना १४ कोटी ७९ लक्ष १३ हजार ५९४ रुपये अनुदान मंजूर झाले होते. यापैकी ४१ हजार ४६१ शेतकऱ्यांचे अनुदान संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे. मात्र बँक खाते क्रमांक चुकीचे असल्याने अद्यापही जिल्ह्यातील ३ हजार २४३ शेतकऱ्यांचे अनुदान जमा करणे बाकी आहे. तरी संबंधित शेतकऱ्यांनी चार दिवसांत संबंधित कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये संपर्क साधून आपल्या बँक खात्याची अचूक माहिती सादर करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रमेश कटके यांनी केले आहे.
चुकीचे बँक खाते असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये लावण्यात आल्या आहेत. हे खाते क्रमांक दुरुस्त करण्याच्या सूचना सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्यांना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. तरी ज्या शेतकऱ्यांनी वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा व मानोरा या सहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ऑक्टोंबर २०१६ ते डिसेंबर २०१६ या कालावधीत सोयाबीन विक्री केली आहे. मात्र त्यांचे बँक खाते क्रमांक चुकीचे असल्याने अनुदानाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होऊ शकलेली नाही, अशा सर्व शेतकऱ्यांनी चार दिवसांच्या आत संबंधित कृषि उत्पन्न बाजार समितीशी संपर्क आपले बँक खाते क्रमांक दुरुस्त करून द्यावेत. चार दिवसांत ही कार्यवाही पूर्ण न झाल्यास सोयाबीन अनुदानाची रक्कम शासनकडे परत पाठविली जाणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे