‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी पंधरवडा’मध्ये आधुनिक कृषि तंत्रज्ञानाविषयी होणार जनजागृती


·      दि. २४ मे ते ७ जून या कालावधीत आयोजन
·      विविध विषयांवर शेतकऱ्यांना केले जाणार मार्गदर्शन
वाशिम, दि. २१ : सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट शासनाने निश्चित केले आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी दि. २४ मे ते ७ जून २०१८ या रोहिणी नक्षत्राच्या कालावधीत जिल्ह्यात ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी पंधरवडा’ राबविला जाणार आहे. याद्वारे आधुनिक कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले जाणार आहे.
प्रमुख पिकांकरिता आधुनिक आणि अद्ययावत कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना, अभियान, उपक्रम यांची माहिती तसेच त्याचा लाभ घेण्यासाठी कार्यपद्धतीबाबत जनजागृती करणे, जमिनीची सुपीकता वाढीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन, बीज प्रक्रियेबाबत प्रात्यक्षिकांचे आयोजन, पिक विमा योजनेंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करून घेऊन नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून पिकांना विमा संरक्षणाबाबत मार्गदर्शन करणे, प्रचलित योजनेचा लाभ न मिळणाऱ्या तसेच कृषि तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी नसणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रमुख पिकांची उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञान प्रसार करण्याच्या अनुषंगाने या पंधरवड्यात जनजागृती केली जाणार आहे.
‘पिक उत्पादनात स्थैर्य राखत उत्पादन खर्च कमी करणे’ आणि ‘प्रति थेंब अधिक पिक’ या संकल्पनांबाबत जनजागृती व मार्गदर्शन करणे, कापसावरील शेंदरी बोंड अळी, सोयाबीनवरील मोझॅक व पिवळा मोझॅक यांच्या एकात्मिक कीड रोग व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करणे, कापसावरील शेंदरी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी फेरोमन ट्रॅप (कामगंध सापळे) आणि ट्रायकोकार्डसचे महत्व व वापराबाबत जनजागृती व मार्गदर्शन,  एकात्मिक शेती पद्धती, बहुवार पीक पध्दती, आंतरपीक पद्धतीविषयी जनजागृती, कृषि संलग्न व कृषि पूरक व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे निव्वळ आर्थिक उत्पन्न वाढीसाठी मार्गदर्शन, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना यामध्ये सहभाग वाढविण्यासाठी जनजागृती, नैसर्गिक आपत्तीपासून बचावात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती, कीडनाशके हाताळणी आणि फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन या पंधरवड्यात केले जाणार आहे.
मोबाईलधारक शेतकऱ्यांना मोफत एस. एम. एस. सेवेचा लाभ व्हावा, म्हणून एम-किसान पोर्टलवर शेतकऱ्यांची नोंदणी करणे, गट अथवा समूहाच्या माध्यमातून शेतीमालावर प्राथमिक प्रक्रिया, मूल्यवर्धन व विपणन करणेबाबत जनजागृती, विविध कृषि निविष्ठा खरेदी करताना घ्यावयाची काळजी याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याबरोबरच जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून तयार झालेल्या जलसाठ्यांमधील पाण्याचा संरक्षित सिंचनासाठी वापराबाबत जनजागृती करणे हा या ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी पंधरवडा’ राबविण्याचा उद्देश आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने व ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे