१३ कोटी वृक्ष लागवड मोहीम पूर्वतयारीचा विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी घेतला आढावा


·        वृक्ष लागवड उद्दिष्ट पूर्तीसाठी सर्व यंत्रणांचा सहभाग आवश्यक
·        स्वयंसेवी संस्थांनाही मोहिमेत सहभागी करून घेण्याच्या सूचना
वाशिम, दि. २४ : राज्य शासनाच्या ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत येत्या १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत राज्यात १३ कोटी वृक्ष लागवड मोहीम राबविली जाणार आहे. याकरिता वाशिम जिल्ह्याला १२ लक्ष ८४ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्यादृष्टीने वाशिम जिल्हा प्रशासनाने केलेल्या पूर्वतयारीचा आढावा आज विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी घेतला. याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात संबंधित विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, यवतमाळचे मुख्य वन संरक्षक पी. जी. राहुरकर, रोहयो उपायुक्त शहाजी पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत, उप वन संरक्षक श्री. वळवी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय अधिकारी के. आर. राठोड, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. गाडेकर, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
विभागीय आयुक्त पियुष सिंह म्हणाले, १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत जिल्ह्याला देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत. वृक्ष लागवडीसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांचे जिओ टॅगिंग करणे आवश्यक असून अद्याप ज्या खड्ड्यांचे जिओ टॅगिंग झालेले नसेल तेथील जिओ टॅगिंगची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. खड्डे खोदणे व जिओ टॅगिंगसाठी संबंधित यंत्रणांनी विशेष मोहीम राबवून ही कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. वृक्ष लागवड मोहिमेत सर्व शासकीय विभागांमार्फत संपूर्ण प्रयत्न होणे आवश्यक आहेत, सोबत जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांना सुध्दा या मोहिमेत सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत.
वृक्ष लागवड मोहिमेत शालेय विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत. या मोहिमेंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड लावण्याचे आवाहन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त श्री. सिंह यांनी यावेळी दिल्या. तसेच नगरविकास विभाग व ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार नगरपरिषद व ग्रामपंचायत क्षेत्रात विशेष प्रसंगी रोपटे भेट देण्याचे नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनानुसार सर्व शासकीय विभागांना वृक्ष लागवडीच्या उद्दिष्ट्यपूर्तीसाठी केलेल्या पूर्वतयारीचा आढावा यावेळी घेण्यात आला.
यावेळी माहिती देताना उप वन संरक्षक श्री. वळवी यांनी सांगितले की, वाशिम जिल्ह्याला १२ लक्ष ८४ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून जिल्हा प्रशासनाने एकूण १३ लक्ष ८८ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन केले आहे. त्यानुसार सर्व संबंधित विभागांमार्फत खड्डे खोडणे व इतर आवश्यक पूर्व तयारी करण्यात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
हरित सेना सदस्य म्हणून नाव नोंदविण्याचे आवाहन
वृक्ष लागवड मोहिमेसोबतच हरित सेना सदस्य नोंदणीला गती देण्यात यावी. जिल्ह्यात आतापर्यंत ५७ हजार ४१६ जणांनी हरित सेनेचे सदस्य म्हणून नोंदणी केली आहे. सर्व शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी यांनी सुध्दा हरित सेनेचे सदस्य म्हणून नोंदणी करावी. ‘ग्रीन आर्मी’ अॅपच्या माध्यमातून ही सदस्य नोंदणी करता येणार आहे. याकरिता स्वयंसेवी संस्थांनी सुद्धा पुढाकार घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी यावेळी केले.
*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे