शेतकऱ्यांना मागणीनुसार प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करा - जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा


• ‘आत्मा’ नियामक मंडळाची आढावा सभा
• सेंद्रिय उत्पादनांच्या विक्रीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना

वाशिम, दि. ३१ : शेतकरी गटामध्ये सहभागी असलेल्या शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन तसेच त्यांच्या मागणीनुसार त्यांना प्रशिक्षण, अभ्यास दौरा, प्रात्यक्षिक व शेतीशाळा आदी सोयी उपलब्ध करून देण्यासाठी ‘आत्मा’च्या माध्यमातून प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)चे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात झालेल्या या बैठकीला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हाउपनिबंधक रमेश कटके, ‘नाबार्ड’चे जिल्हा विकास प्रबंधक विजय खंडरे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे, आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, अशासकीय सदस्य गोपाळराव लुंगे, विठ्ठलराव आरु आदी उपस्थित होते. सर्वप्रथम दिवंगत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना आदरांजली वाहून सभेला सुरुवात करण्यात आली.
जिल्हाधिकारी श्री. मिश्रा म्हणाले, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी तसेच इतर कृषि पूरक व्यवसायाच्या अनुषंगाने आवश्यक योग्य प्रशिक्षण मिळाल्यास त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. त्यामुळे ‘आत्मा’च्या माध्यमातून स्थापन झालेल्या शेतकरी गटांमधील शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार प्रशिक्षण उपलब्ध करून द्यावे. त्याचप्रमाणे प्रात्यक्षिक, शेतीशाळा व राज्यांतर्गत, राज्याबाहेरील अभ्यासदौऱ्यांचे आयोजन करतानाही प्रथम शेतकऱ्यांची मागणी विचारात घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. जिल्ह्यात ३४५ पैकी ६७ शेतकरी मित्रांची निवड करण्याची प्रक्रिया अद्याप प्रलंबित असून सदर कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.
‘आत्मा’च्या माध्यमातून पुढील वर्षभरात आयोजित केल्या जाणाऱ्या उपक्रमांचे महिनानिहाय वेळापत्रक तयार करावे. तसेच शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील तज्ज्ञ मार्गदर्शक, प्रगतशील शेतकरी यांची यादी तयार करून ती सर्व तालुका तंत्रज्ञान चमूला वितरीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. मिश्रा यांनी यावेळी केल्या. त्याचबरोबर जिल्ह्यात स्थापन झालेल्या शेतकरी गटांच्या माध्यमातून सेंद्रिय शेती केली जात आहे. यामाध्यमातून उत्पादित होणाऱ्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सुध्दा ‘आत्मा’द्वारे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सन २०१७-१८ मध्ये ‘आत्मा’च्या माध्यमातून राबविण्यात आलेले विविध उपक्रम, तसेच सन २०१८-१९ मधील आराखडा याविषयी चर्चा झाली.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे