जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांना गती द्या - विभागीय आयुक्त पियुष सिंह
·
सन २०१७-१८ मधील सर्व प्रस्तावित कामे १५ जूनपर्यंत पूर्ण
करा
·
मागेल त्याला शेततळे, नरेगामधील कामांचाही आढावा
·
सर्व कामांचे जिओ टॅगिंग करण्याच्या सूचना
वाशिम, दि. २४ : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सन २०१७-१८ मध्ये निवडण्यात
आलेल्या गावांमधील प्रस्तावित कामे १५ जून २०१८ पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. याकरिता
या कामांना गती देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आज जिल्हाधिकारी
कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत दिल्या. या बैठकीत मागेल त्याला शेततळे, महात्मा
गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांचाही आढावा घेण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, रोहयो उपायुक्त शहाजी पवार,
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उप वन संरक्षक श्री. वळवी, निवासी
उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, जिल्हा अधीक्षक
कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय अधिकारी के. आर.
राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे
कार्यकारी अभियंता के. आर. गाडेकर, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत
बोरसे, उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, डॉ. शरद जावळे यांच्यासह संबंधित
विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
श्री. सिंह म्हणाले, जलयुक्त शिवार
अभियान अंतर्गत जिल्ह्यात सुरु असलेली सन २०१७-१८ मधील कामे पूर्ण करण्यासाठी १५
जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यादृष्टीने सर्व अपूर्ण कामे तसेच प्रस्तावित
कामे विहित कालावधीत होण्यासाठी संबंधित यंत्रणांनी नियोजन करावे. यामध्ये कोणतीही
दिरंगाई होणार नाही, याची खबरदारी घावी. तसेच सन २०१८-१९ मध्ये जलयुक्त शिवार अभियानात
समाविष्ट करण्यात येणाऱ्या गावांचा आराखडा अंतिम करण्याची कार्यवाही लवकरात लवकर
पूर्ण करावी.
मागेल त्याला शेततळे, सिंचन विहिरींच्या कामांना गती देऊन पावसाळ्यापूर्वी जास्तीत
जास्त कामे पूर्ण करावीत. सिंचन विहिरींच्या उद्दिष्टपूर्तीसाठी सर्व संबंधित यंत्रणांनी
विशेष प्रयत्न करावेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सुरु
असलेल्या कामांचे मस्टर काढण्याची कार्यवाही विहित कालावधीत व्हावी. तसेच या
कामांवर येणाऱ्या मजुरांना वेळेवर मोबदला अदा करण्यात यावा. यामध्ये दिरंगाई
करणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करावी, असे विभागीय आयुक्तांनी यावेळी सांगितले.
तसेच जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण
रोजगार हमी योजनेतून पूर्ण झालेल्या कामांचे जिओ टॅगिंग करण्याच्या सूचनाही
त्यांनी यावेळी दिल्या.
*****
सोबत
फोटो.
Comments
Post a Comment