कृषि, आरोग्य व शिक्षण क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य द्या - पालक सचिव नंद कुमार




·        ‘ट्रान्सपोर्टफॉर्मिंग अॅस्पिरिशनल डिस्ट्रिक्टस्’ उपक्रमाविषयी आढावा
वाशिम, दि. २५ : जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचाविण्याच्या दृष्टीने व जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी नीती आयोगाच्यामाध्यमातून ‘ट्रान्सपोर्टफॉर्मिंग अॅस्पिरिशनल डिस्ट्रिक्टस्’ उपक्रमांतर्गत प्रयत्न केले जात आहेत. या अंतर्गत कृषि, आरोग्य व शिक्षण क्षेत्राच्या विकासाला विशेष प्राधान्य देऊन संबंधित विभागांनी त्यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालक सचिव तथा राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंद कुमार यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित ‘ट्रान्सपोर्टफॉर्मिंग अॅस्पिरिशनल डिस्ट्रिक्टस्’  विषयीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे, सुदाम इस्कापे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे, शिक्षणाधिकारी अंबादास मानकर, तानाजी नरळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. नंद कुमार म्हणाले, जिल्ह्यामध्ये कृषि क्षेत्राच्या विकासाठी सिंचन सुविधा निर्मितीवर भर देण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविण्यासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे. याकरिता शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानासोबतच लोकसहभागातून जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे करण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब जमीनीमध्ये जिरविण्याचा प्रयत्न करावा. तसेच सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर वाढविण्यासाठी सुध्दा शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. त्याचबरोबर कृषि क्षेत्रात कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे.
कुपोषण टाळण्यासाठी गरोदर महिलांची नियमित तपासणी, बालकांची तपासणी व आवश्यक उपाययोजना नियमित करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात एकाही बालकाचे कुपोषण होणार नाही, यासाठी आरोग्य विभागाने विशेष खबरदारी घ्यावी, असे श्री. नंद कुमार यांनी यावेळी सांगितले. शिक्षण क्षेत्रात सुधारणांसाठी प्रयत्न करताना सर्वप्रथम प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत प्रवेश घेताना होणारी विद्यार्थी गळती रोखण्यावर भर द्या. तसेच प्राथमिक शाळेत विद्यार्थांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल, यासाठी प्रयत्न करा, असेही श्री. नंद कुमार यांनी यावेळी सांगितले.
‘ट्रान्सपोर्टफॉर्मिंग अॅस्पिरिशनल डिस्ट्रिक्टस्’ अंतर्गत विविध विभागांच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या योजना, उपक्रमांच्या नियोजनाचा आढावाही पालक सचिव नंद कुमार यांनी यावेळी घेतला. तसेच त्याअनुषंगाने आवश्यक सूचना दिल्या. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाशी संबंधित निर्देशांकानुसार सद्यस्थिती व त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आखण्यात आलेल्या उपाययोजना याविषयी सादरीकरण केले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे