स्वयंसेवी संस्थांनी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा
वाशिम, दि. २९ : जिल्ह्यात वृक्षांची संख्या अतिशय कमी आहे. पर्यावरणाच्या
संतुलनासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होणे आवश्यक आहे. याकरिता राज्य
शासनामार्फत दि. १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या १३
कोटी वृक्ष लागवड मोहिमेत सर्वसामान्य नागरिक व स्वयंसेवी संस्थांनी सहभागी होऊन
जिल्ह्यात जास्तीत जास्त वृक्ष लागवड व वृक्ष संगोपन करण्यासाठी पुढाकार घेण्याचे
आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज केले. जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित वृक्ष लागवड मोहीम पूर्वतयारी आढावा बैठकीत
ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
दीपक कुमार मीना, उप वन संरक्षक श्री. वळवी, रोहयोचे
उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय अधिकारी के. आर.
राठोड, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी
प्रमोद कापडे यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख, विविध स्वयंसेवी संस्थांचे
प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.
मिश्रा म्हणाले, वाशिम जिल्ह्याला
१२ लक्ष ८४ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून जिल्हा प्रशासनाने
एकूण १३ लक्ष ८८ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन केले आहे. सर्व शासकीय विभागांनी
ठरवून देण्यात आलेल्या उद्दिष्टानुसार खड्डे खोदण्याची व त्याबाबतची माहिती सादर
करण्याची कार्यवाही तातडीने करावी. राज्य शासनाच्या ही अतिशय महत्त्वाकांक्षी मोहीम
असून यामध्ये सर्व शासकीय विभागांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. जिल्ह्यातील बँकांनी
सुध्दा या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हावे. तसेच विविध स्वयंसेवी संस्थांनी सुध्दा
या मोहिमेत सहभागी होऊन जिल्ह्यात जास्तीत जास्त वृक्ष लागवड होण्यासाठी प्रयत्न
करावा. स्वयंसेवी संस्था, सर्वसामान्य नागरिक यांच्यामार्फत वृक्ष लागवडीचा उपक्रम
राबविला जाणार असल्यास त्याची माहिती वन विभागाकडे देण्याचे आवाहनही त्यांनी
यावेळी केले.
जिल्हा परिषदेच्या यंत्रणांचा सक्रीय सहभाग आवश्यक : मुख्य
कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना
१३ कोटी वृक्ष लागवड
मोहिमेंतर्गत प्राप्त झालेल्या वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्हा
परिषदेच्या सर्व यंत्रणांचा सहभाग आवश्यक असून या अनुषंगाने केलेल्या पूर्व
तयारीचा अहवाल सादर करण्याच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक
कुमार मीना यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींनी वृक्ष लागवडीमध्ये
पुढाकार घेऊन वेगळा आदर्श निर्माण करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
Comments
Post a Comment