शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या विकासाला केंद्र सरकारचे प्राधान्य - संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे
·
वाशिम येथे ‘सबका
साथ, सबका विकास संमेलन’
·
केंद्र सरकारने
गेल्या तीन वर्षात राबविलेल्या योजनांचे प्रदर्शन
·
कोणत्याही आक्रमणांचा
सामना करण्यास भारतीय सैन्य सक्षम
वाशिम, दि. ८ : देशातील
शेतकरी, वंचित, सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांचा सर्वांगीण
विकास करण्यास केंद्र सरकारचे प्राधान्य असल्याचे प्रतिपादन संरक्षण राज्यमंत्री
डॉ. सुभाष भामरे यांनी केले. वाशिम येथे वणी नॉर्थ क्षेत्राच्या वेस्टर्न
कोलफिल्ड्स लिमिटेडच्यावतीने आयोजित ‘सबका साथ, सबका विकास संमेलन’च्या
उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे गृह राज्यमंत्री
डॉ. रणजीत पाटील होते. केंद्र सरकारने गेल्या तीन वर्षात राबविलेल्या योजनांची
माहिती देण्यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कारंजा-मानोराचे
आमदार राजेंद्र पाटणी, हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक
हेडा, उपनगराध्यक्ष रुपेश वाघमारे, शिवराज कुलकर्णी, नरेंद्र गोलेच्छा, राजू पाटील
राजे, धनंजय रणखांब, शाम बडे, तेजराव वानखडे, वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेडचे
महाप्रबंधक आर. के. सिंह, क्षेत्रीय कार्मिक प्रबंधक प्रभाकर देशपांडे उपस्थित
होते.
ना. डॉ. भामरे
म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने
गेल्या तीन वर्षात शेतकरी, वंचित, गरीब जनतेला केंद्रस्थानी ठेऊन विविध योजना
आखल्या व त्याची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. शेतीच्या विकासाठी विशेष प्रयत्न
करण्यात येत आहेत. याकरिता देशातील अपूर्ण सिंचन प्रकल्प २०१९ पर्यंत पूर्ण
करण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना राबविली जात आहे. नैसर्गिक आपत्तीत
पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा
योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची
मृद आरोग्य पत्रिका देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
सर्वसामान्य नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचे अनुदान थेट
त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र
मोदी यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला. त्यामुळे भ्रष्टाचार कमी होऊन सरकारची ५०
हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे. कोळसा खाण, स्पेक्ट्रम लिलावामध्येही पारदर्शकता
आणल्याने केंद्र शासनाला कोट्यावधी रुपयांचा निधी उभारता आला. या निधीतून देशभरात
पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध झाला आहे. पारदर्शक कारभारामुळे
गेल्या तीन वर्षात विकास कामांचा वेग वाढविण्यात केंद्र सरकारला यश आल्याचे ना.
डॉ. भामरे यांनी सांगितले.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन विमा योजना, अटल पेन्शन
योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील नागरिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात
आली आहे. गरीब कुटुंबातील महिलांच्या सन्मानासाठी उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गरीब
कुटुंबातील सुमारे २ कोटी महिलांना मोफत घरगुती गॅसची जोडणी देण्यात आली आहे. तसेच
प्रधामंत्री मुद्रा योजना, स्टार्टअप इंडिया, स्डँडअप इंडियाच्या माध्यमातून महिलांना
उद्योग, व्यवसायासाठी मदत दिली जात असल्याचे संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी
सांगितले. यावेळी त्यांच्या हस्ते वाशिम जिल्ह्यातील उज्ज्वला योजनेच्या
लाभार्थ्यांना घरगुती गॅस जोडणी पत्राचे वाटप करण्यात आले.
कोणत्याही आक्रमणांना ‘जशास तसे’ उत्तर देण्यास भारतीय
सैन्य सक्षम
देशाच्या सीमारेषालगत
सुरु असलेल्या घडामोडींमुळे वातावरण तणावपूर्ण बनले आहे. मात्र देशावर कोणत्याही
प्रकारचे आक्रमण झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी भारतीय सैन्य सक्षम असल्याचे
संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे म्हणाले. भारतीय सैन्याने आजपर्यंत अनेक वेळा अतंत्य
कठीण परिस्थितीवर मात करत देशाचे रक्षण केले आहे. सर्जिकल स्ट्राईक दरम्यान
पाकिस्तानच्या हद्दीत घुसून अतिरेक्यांचे तळ उध्वस्त करण्याची कामगिरी आपल्या
जवानांनी यशस्वीपणे केली आहे. देशावर कोणतेही आक्रमण झाल्यास त्याला, त्याच भाषेत
उत्तर देण्याची क्षमता भारतीय सैन्य दलाकडे आहे. त्यामुळे सीमारेषेवर सध्या सुरु
असलेल्या घडामोडींमुळे चिंतीत होण्याचे कोणतेही कारण नसल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी प्रयत्न : गृह
राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील
केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यात शेती व शेतकऱ्यांच्या
विकासाच्या योजना राबविण्यात प्राध्यान्य दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी ३४ हजार कोटी रुपयांची शेतकरी कर्जमाफी करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.
भविष्यात शेतकरी कर्जबाजारी होऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न सुरु आहेत.
शेतकऱ्यांना महात्मा फुले आरोग्यदायी योजनेचा लाभ देणे व अन्नसुरक्षा योजनेच्या दरात
धान्य देण्यासारखे महत्वपूर्ण निर्णयही राज्य शासनाने यापुर्वीतच घेतले आहेत. तसेच
ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य
शासनाच्या माध्यमातून व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे राज्याचे गृह
राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सांगितले. वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीवर ११
बॅरेजसची उभारणी करून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या परिसरातील
शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यासाठीही प्रयत्न सुरु आहेत. समाजातील गरीब, वंचित व
दिव्यांग व्यक्तीला शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केंद्र व राज्य
सरकारच्या माध्यमातून सुरु असल्याचेही ना. डॉ. पाटील यावेळी म्हणाले.
यावेळी बोलताना आ. पाटणी म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून गेल्या
तीन वर्षात वाशिम जिल्ह्यात अनेक विकास कामे सुरु झाली आहेत. केंद्रीय रस्ते
वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे ६ हजार
कोटी रुपये उपलब्ध करून दिले. तसेच रेल्वे विभागाच्या माध्यमातून सुरु झालेल्या
वर्धा ते नांदेड आणि अचलपूर ते यवतमाळ रेल्वे मार्गाच्या कामांमुळे जिल्ह्याच्या
विकासाला गती मिळणार आहे. नागपूर-मुंबई समृद्धी मार्गाचा सुमारे ११० किलोमीटर
टप्पा वाशिम जिल्ह्यातून जात असून त्याचाही भविष्यात जिल्हाला फायदा होईल. स्वच्छ
भारत अभियानमध्ये कारंजा तालुका हागणदारीमुक्त झाला असून अमरावती विभागातील
हागणदारीमुक्त होणार तो पहिलाच तालुका असल्यचे आ. पाटणी म्हणाले.
यावेळी केंद्र सरकारने गेल्या तीन वर्षात राबविलेल्या विविध लोकोपयोगी
योजनांवर आधारित चित्रफित दाखविण्यात आली. वेस्टर्न कोलफिल्डसच्या वतीने यावेळी वाशिम
नगरपरिषदेला २०० रोपे भेट देण्यात आली. प्रास्ताविक वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेडचे
महाप्रबंधक आर. के. सिंह यांनी तर आभार प्रदर्शन क्षेत्रीय कार्मिक प्रबंधक
प्रभाकर देशपांडे यांनी केले.
*****
Comments
Post a Comment