कर्जमाफीमुळे संकटातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला - किशोर तिवारी


·        मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शेतकऱ्यांसाठी प्रामाणिक प्रयत्न
·        अर्ज प्रक्रियेमुळे प्रामाणिक शेतकऱ्यालाच कर्जमाफी मिळेल
वाशिम, दि. २८ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने दि. ३० जून २०१६ अखेर थकीत असलेले शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना लागू केली आहे. त्यामुळे राज्यातील ४० लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असून गेल्या अडीच वर्षांमध्ये त्यांनी राबविलेल्या विविध योजनांचा शेतकऱ्यांना अतिशय फायदा झाल्याचे वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सांगितले. सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषेदेत ते बोलत होते.
श्री. तिवारी म्हणाले की, शेतकरी कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेऊन राज्य शासनाने दि. ३० जून २०१६ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचे दीड लाख रुपयांपर्यतचे कर्ज माफ केले आहे. याकरिता पात्र शेतकऱ्यांचे ऑनलाईन व ऑफलाईन अर्जासह आधार क्रमांक संकलित करण्याचे काम सुरु झाले आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सर्व महा ई-सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्रांवर ऑनलाईन अर्ज भरण्याची निःशुल्क सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच ज्या बँकेतून शेतकऱ्याने कर्ज घेतले आहे, त्या बँक शाखेत ऑफलाईन स्वरूपातील अर्ज स्वीकारले जात आहेत. दि. ३१ ऑक्टोंबर २०१७ पर्यंत शेतकरी आपले अर्ज सादर करू शकतात. कर्जमाफीसाठी अर्ज प्रक्रिया ठेवल्यामुळे प्रामाणिक शेतकऱ्यांचा या योजनेचा लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जलयुक्त शिवार अभियानातून जिल्ह्यात सन २०१५-१६ मध्ये ५ हजार ०२५ कामे, सन २०१६-१७ मध्ये १हजार ८६६ कामे व सन २०१७-१८ मध्ये ६०३ कामे झाली आहेत. यामुळे शेतीसाठी संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण झाल्याने खरीप हंगामाबरोबरच  रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पादनातही वाढ झाली आहे. कृषीपंप वीज जोडणीच्या कामालाही गती मिळाली असून सन २०१५-१६ व २०१६-१७ मध्ये एकूण ७ हजार ९४३ कृषीपंपाना वीज जोडणी देण्यात आली आहेत. तसेच चालू वर्षात आतापर्यंत १ हजार ११ कृषीपंपांना वीज जोडणी देण्याची कार्यवाही पूर्ण झाली असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे श्री. तिवारी यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासनाने गेल्या अडीच वर्षांमध्ये शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये सकारात्मकता आली आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाणही कमी होत आहे. कर्जमाफीनंतर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये, यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न सुरु असल्याचे श्री. तिवारी म्हणाले. यावेळी त्यांनी तूर खरेदी, खरीप हंगामासाठी १० हजार रुपयांची तातडीची मदत, पिक कर्ज वितरण याविषयी माहिती दिली.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे