भामदेवीमध्ये साजरा झाला अडीच हजार झाडांचा वाढदिवस
·
नागरिक,
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
·
गतवर्षी
प्रत्येक व्यक्तीने लावले होते एक झाड
·
दिंडी काढून
दिला वृक्ष लागवडीचा संदेश
वाशिम, दि. ०१ : गतवर्षी
वृक्ष लागवड मोहिमेदरम्यान दि.१ जुलै २०१६ रोजी भामदेवी (ता. कारंजा) येथील
ग्रामस्थांनी एकत्र येऊन प्रत्येक व्यक्तीने एक याप्रमाणे २५०० रोपांची लागवड केली
होती. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या संकल्पनेतून झालेल्या या वृक्षारोपणाला
आज एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने केक कापून अडीच हजार
झाडांचा वाढदिवस साजरा केला. तसेच यावेळी झाडांचे महत्व पटवून देण्यासाठी
गावामध्ये वृक्ष दिंडी काढण्यात आली.
यावेळी कारंजाचे उपविभागी अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार
सचिन पाटील, सरपंच सुभाष मोहकर, उपसरपंच देवचंद कांबळे, पोलीस पाटील पंडित
मेश्राम, राजुभाऊ चव्हाण, नामदेव निंबलवार, रोहिदास भैराणे, प्रेमानंद राऊत, मंडळ अधिकारी एस. आर. कानडे, तलाठी ए. बी. मिश्रा, ग्रामसेवक गजानन उपाध्ये यांच्यासह
नागरिक उपस्थित होते.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून जिल्हाधिकाऱ्यांना मिळालेल्या २
कोटी रुपये विशेष निधीतून टंचाईग्रस्त गाव अशी ओळख असलेल्या भामदेवी गावामध्ये विविध
विकास कामे राबविण्यात येत आहेत. यामधून गतवर्षी गावातील शासकीय मालकीच्या साडेसहा
हेक्टर जमिनीवर समतल चर खोदण्यात आले होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या
पुढाकाराने या जमिनीवर वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्यात आले. यामध्ये गावातील
प्रत्येक नागरिकाने सहभाग नोंदवून आपल्या नावाचे झाड स्वतःच्या हाताने लावण्याचे
आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी लोकसहभागातून
वृक्षारोपणासाठी खड्डे तयार केले.
दि. १ जुलै २०१६ रोजी वृक्ष लागवड मोहिमेत सर्व ग्रामस्थांनी
सहभाग घेऊन वृक्ष लागवड व त्यांची जोपासना करण्याची प्रतिज्ञा केली. महिला,
शाळकरी मुले, वृध्द नागरिक यांच्यासह
युवक-युवतींनी सक्रीय सहभाग नोंदवत प्रत्येकी एका झाड लावले होते. तसेच वृक्ष
लागवड कार्यक्रमात सहभागी झालेले लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या नावेही एक-एक झाड
लावण्यात आले होते. अशाप्रकारे एकाच दिवशी भामदेवी येथे २५०० रोपांची लागवड
करण्यात आली. ग्रामस्थांनी रोपांची निगा राखल्याने यापैकी ९५ टक्के पेक्षा अधिक रोपे
आजही जिवंत आहेत.
प्रसिद्ध जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनीही भामदेवी येथील
वृक्षारोपण स्थळाला भेट देऊन ग्रामस्थांचे कौतुक केले. तसेच जिल्हाधिकारी राहुल
द्विवेदी यांच्या प्रेरणेतून ही वृक्ष लागवड झाल्याने ग्रामस्थांनी या ठिकाणाला
‘राहुल उद्यान’ असे नाव दिले आहे. या वृक्षारोपण कार्यक्रमला आज एक वर्ष पूर्ण
झाल्याने भामदेवीतील ग्रामस्थांनी झाडांचा वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन केले
होते. यानिमित्ताने वृक्षारोपण, पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी ग्रामपंचायत
कार्यालयापासून वृक्ष दिंडी काढण्यात आली. यावेळी गुरुदेव सेवा मंडळाने झाडांचे
महत्त्व सांगणारे अभंग, भजन सादर करून नागरिकांना वृक्ष लागवड करण्याचे आवाहन
केले. या वृक्ष दिंडीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जगदंबा विद्यालयाचे विद्यार्थी,
नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. पालखीमध्ये रोपे ठेऊन निघालेल्या या दिंडीचे
महिलांनी जागोजागी स्वागत करून वृक्षांची पूजा केली. यानंतर विद्यार्थ्यांच्या
हातून केक कापून झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थी व
नागरिकांनी यावर्षीही किमान एक तरी झाड लावण्याचा निर्धार केला.
भामदेवीत यावर्षीही लावणार अडीच हजार वृक्ष
गतवर्षी झालेल्या वृक्ष लागवडीतील रोपांची नागरिकांनी
चांगली निगा राखली आहे. प्रत्येक वर्षी एक तरी झाड लावून त्याची जोपासना करून आमचा
गाव वनयुक्त बनविण्याचा प्रयत्न आहे. यावर्षीही गावामध्ये अडीच हजार वृक्ष
लावण्याचे नियोजन आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून यावर्षी झालेल्या सलग समतल
चरच्या परिसरात दि. २० मे २०१७ रोजी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या
उपस्थितीमध्ये वृक्षारोपणासाठी श्रमदानातून अडीच हजार खड्डे खोदण्यात आले आहेत. याठिकाणी
दि. ७ जुलै २०१७ पूर्वी वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे सरपंच सुभाष मोहकर
यांनी सांगितले.
Comments
Post a Comment