वृक्ष लागवड सप्ताह अंतर्गत जिल्ह्यात ५ लाख ९० हजार वृक्षांची लागवड
·
प्राप्त उद्दिष्टाचा टप्पा ओलांडला
·
५ लाख ८ हजार वृक्ष लागवडीचे होते उद्दिष्ट
वाशिम, दि. ७ : राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या ४ कोटी
वृक्ष लागवड कार्यक्रम अंतर्गत वृक्षारोपण मोहिमेसाठी जिल्ह्याला यंदा ५ लाख ८
हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. दि. १ जुलै पासून सुरु असलेल्या वृक्ष
लागवड सप्ताहाच्या आज अखेरच्या दिवशी जिल्ह्याने विविध शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी
संस्था व नागरिकांच्या मदतीने ५ लाख ९० हजार वृक्ष लागवडीचा टप्पा गाठला असल्याचे
वन विभागाने कळविले आहे.
५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत यावर्षी राज्यात दि.
१ ते ७ जुलै दरम्यान ४ कोटी वृक्ष लागवड करण्याचे राज्य शासनाचे नियोजन होते.
त्यानुसार प्रत्येक जिल्हाला उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले होते. वाशिम जिल्ह्यालाही
५ लाख ८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. या अनुषंगाने जिल्हा
प्रशासनाने उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजेच ५ लाख २२ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन
केले होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष लागवड
मोहिमेची पूर्वतयारी व सूक्ष्म नियोजन करण्यात आले होते. तसेच जिल्हाधिकारीराहुल
द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती
मोक्षदा पाटील, सहाय्यक वन संरक्षक आर. बी. गवई, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील
कोरडे, विभागीय वन अधिकारी के. आर. राठोड यांच्यासह इतर शासकीय विभाग प्रमुखांच्या
उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकांमध्ये याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला
होता. या वृक्षारोपण मोहिमेत ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्था व नागरिकांनीही
सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते.
दि. १ जुलै रोजी प्रत्यक्ष वृक्षारोपण मोहिमेस सुरवात
झाल्यानंतर जिल्ह्यात लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, नागरिक
यांच्यासह शासकीय यंत्रणांमार्फत वृक्षारोपणास सुरुवात झाली. सलग सात दिवस सुरु
असलेल्या या वृक्षारोपण मोहिमेमुळे दि. ७ जुलै २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५
लाख ९० हजार २२९ वृक्ष लागवडीची नोंद झाल्याची माहिती सहाय्यक वन संरक्षक आर. बी.
गवई यांनी दिली.
Comments
Post a Comment