बँकांनी सर्व पात्र शेतकऱ्याला दहा हजार रुपयेपर्यंतच्या तातडीच्या कर्जाचे वाटप करावे - किशोर तिवारी
·
जिल्हधिकारी
कार्यालयात आढावा बैठक
·
कर्ज वाटपाबाबतचा फलक
प्रत्येक बँकेत लावा
·
प्रधानमंत्री पीक
विमा योजनेसाठी रविवारीही बँक सुरु राहणार
वाशिम, दि. २८ : राज्य
शासनाने दि. ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी
निविष्ठा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने १० हजार रुपयांपर्यंतचे तातडीचे कर्ज उपलब्ध
करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने सर्व बँकांना त्यांच्या वरिष्ठ
कार्यालयांकडून सूचनाही प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र
शेतकऱ्यांना १० हजार रुपयांपर्यंतच्या कर्जाचा लाभ देण्याच्या सूचना कै. वसंतराव
नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सर्व बँक अधिकाऱ्यांना
दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील
यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी तथा प्र.
जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील कोरडे, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, अभिषेक देशमुख,
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. बी. पटेल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर,
पोलीस उपाधिक्षक श्री. घुगे, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, जिल्हा अधीक्षक कृषी
अधिकारी दत्तात्रय गावसाने, नाबार्डचे विजय खंडरे, जिल्हा अग्रणी बँकेचे
व्यवस्थापक विजय नागराळे, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. डी. एल. जाधव, तहसीलदार
बळवंत अरखराव, सचिन पाटील आदी उपस्थित होते.
श्री.
तिवारी म्हणाले की, सध्या खरीप हंगाम सुरु असल्याने शेतकऱ्यांना खते, कीटकनाशक
याकरिता पैशांची आवश्यकता असते. खरीपासाठी द्यावयाचे तातडीचे १० हजार रुपयांपर्यंत
कर्ज उपलब्ध करून देण्याच्या निर्णयास शासनाने दि. ३१ ऑगस्ट २०१७ पर्यंत मुदतवाढ
दिली आहे. त्यामुळे या कर्जासाठी बँकेत येणाऱ्या प्रत्येक पात्र शेतकऱ्याला बँकेने
कर्ज उपलब्ध करून द्यावे. प्रत्येक बँक शाखेमध्ये हे कर्ज वाटप सुरु असल्याचा फलक
दर्शनी भागात लावावेत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
१०
हजार रुपयांपर्यंतच्या तातडीच्या कर्जाबाबत समस्या असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
१०
हजार रुपयांपर्यंतचे तातडीचे कर्ज मिळविताना पात्र शेतकऱ्यांना काही समस्या
असल्यास त्यांनी किशोर तिवारी (भ्रमणध्वनी क्र. ९४२२१०८८४६) व जिल्हाधिकारी राहुल
द्विवेदी (भ्रमणध्वनी क्र. ८८०६२६८८११) यांच्याशी संपर्क साधावा. सर्व
तहसीलदारांनीही त्यांच्या स्तरावरून या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन
करण्याच्या सूचना किशोर तिवारी यांनी यावेळी दिल्या.
बँकेत
रविवारीही स्वीकारले प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे प्रस्ताव
प्रधानमंत्री
पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या अतिशय फायद्याची आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड व रोग
यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास त्यांची भरपाई या योजनेमुळे मिळणार आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन
कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी यावेळी केले.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा विमा हप्ता व प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत ३१
जुलै २०१७ असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, याकरिता रविवार, दि. ३० जुलै २०१७
रोजी सुद्धा बँकांमध्ये पीक विमा प्रस्ताव व विमा हप्त्याची रक्कम स्वीकारली जाणार
असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले.
Comments
Post a Comment