भामदेवीमध्ये लोकसहभागातून २ हजार वृक्षांची लागवड







·        राज्य शासनाच्या वृक्ष लागवड सप्ताह अंतर्गत उपक्रम
·        सलग दुसऱ्या वर्षी ग्रामस्थांचा वृक्षारोपणासाठी पुढाकार
·        जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रेरणेने गाव वनयुक्त करण्याचा निर्धार
वाशिम, दि. ०६ : राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या ४ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत सुरु असलेल्या वृक्ष लागवड सप्ताह अंतर्गत आज भामदेवी (ता. कारंजा) येथे लोकसहभागातून सुमारे २ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या प्रेरणेतून गतवर्षीही भामदेवी येथील ग्रामस्थांनी ‘एक व्यक्ती, एक वृक्ष’ याप्रमाणे २ हजार ५०० वृक्षांची लागवड केली होती. या झाडांचा वाढदिवसही दि. १ जुलै २०१७ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आज झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, कारंजाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार सचिन पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी सुद्धा सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना मिळालेल्या २ कोटी रुपये निधीतून भामदेवी येथे विविध विकास कामे राबविण्यात येत आहेत. यामध्ये शेततळे, नाला खोलीकरण, सलग समतल चर यासारख्या जलसंधारणाच्या कामांचाही समावेश आहे. गतवर्षी याठिकाणी शासकीय मालकीच्या साडेसहा हेक्टर जमिनीवर समतल चर खोदण्यात आले होते. राज्य शासनाने गतवर्षी राबविलेल्या २ कोटी वृक्ष लागवड मोहिमेदरम्यान या परिसरात गावातील प्रत्येक नागरिकाने सहभाग नोंदवून आपल्या नावाचे झाड स्वतःच्या हाताने लावण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते. त्यानुसार दि. १ जुलै २०१६ रोजी भामदेवीच्या ग्रामस्थांनी वृक्ष लागवड मोहिमेत सहभाग घेऊन प्रत्येकी एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्याची प्रतिज्ञा केली होती. तसेच जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली गाव वनयुक्त बनविण्याचा निर्धार केला होता. भामदेवीतील ग्रामस्थांच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक झाले होते. गतवर्षी लागवड करण्यात आलेल्या २ हजार ५०० वृक्षांचा नुकताच दि. १ जुलै २०१७ रोजी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी काढण्यात आलेल्या वृक्ष दिंडीद्वारे वृक्ष लागवडीविषयी जनजागृती करण्यात आली.
यावर्षी सुध्दा वृक्ष लागवडी मोहिमेत सहभागी होण्याचा भामदेवी येथील ग्रामस्थांनी निश्चय केला. त्यानुसार गावामध्ये १८ हेक्टर क्षेत्रावर खोदण्यात आलेल्या सलग समतल चर परिसरात दि. २० मे २०१७ रोजी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या उपस्थितीमध्ये लोकसहभागातून खड्डे खोदण्यात आले. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सुमारे २ हजार रोपे पुरविण्यात आली. यामध्ये जांभूळ, सीताफळ, आवळा, सिसम, कडूनिंब आदी प्रजातींचा समावेश आहे. या रोपांची आज लागवड करण्यात आली. या वृक्ष लागवड कार्यक्रमात ग्रामस्थांसह जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह शासकीय अधिकारीही सहभागी झाले होते. सलग दुसऱ्या वर्षी भामदेवी यथील ग्रामस्थांनी वृक्ष लागवड उत्स्फूर्त सहभाग घेऊन गाव वनयुक्त बनविण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले व लागवड केलेल्या प्रत्येक वृक्षाची जोपासना करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
वृक्ष लागवड कार्यक्रमात विभागीय वन अधिकारी के. आर. राठोड, सहाय्यक वन संरक्षक आर. बी. गवई, तालुका कृषी अधिकारी समाधान धूळधुळे, सरपंच सुभाष मोहकर, उपसरपंच देवचंद कांबळे, पोलीस पाटील पंडित मेश्राम, मंडळ अधिकारी एस. आर. कानडे, कृषी सहाय्यक प्रेमानंद राऊत, तलाठी ए. बी. मिश्रा, ग्रामसेवक गजानन उपाध्ये, संजय ढावक, बंडू भैराणे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.
विद्यार्थी, युवकांसह महिलांचा वृक्ष लागवडीत उत्स्फूर्त सहभाग
भामदेवी येथे आज झालेल्या वृक्ष लागवड मोहिमेत विद्यार्थी, युवकांसह महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सकाळी ८ वाजले पासूनच ग्रामस्थांनी वृक्ष लागवडीस सुरुवात केली होती. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यावेळी विद्यार्थी व युवकांशी संवाद साधून त्यांना वृक्ष लागवडीविषयी प्रोत्साहित केले. प्रत्येकाने आपण लावलेल्या रोपट्याचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे