पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीमध्ये उपविभागीय स्तरावर होणार ‘समाधान शिबीर’


·        महाराजस्व अभियान अंतर्गत आयोजन
वाशिम, दि. १३ :  सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यासाठी महाराजस्व अभियान अंतर्गत तीनही उपविभाग स्तरावर समाधान शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिल्या आहेत. या समाधान शिबिराला पालकमंत्री स्वतः उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या सोडविणार आहेत. याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या जिल्हास्तरीय शासकीय विभाग प्रमुखांच्या बैठकीत समाधान शिबिराच्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार भावना गवळी, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती विश्वनाथ सानप, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी  उपस्थित होते.
महाराजस्व अभियान अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या समाधान शिबिरामध्ये संबंधित उपविभागाचे उपविभागीय अधिकारी नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. या शिबिर अंतर्गत तक्रारी प्रत्येक तहसीलदार कार्यालयात स्वीकारण्यात येतील. याकरिता निश्चित वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. त्यानुसार नागरिकांचे तक्रार अर्ज स्वीकारून ते संबंधित यंत्रणेकडे पाठविण्याचे काम तहसीलदार स्तरावरून होणार आहे. तसेच संबंधित विभागांनी विहित कालावधीत अर्जावर उत्तर सादर करणे बंधनकारक राहणार आहे. कारंजा उपविभाग स्तरावर दि. २६ मे २०१७, मंगरूळपीर उपविभाग स्तरावर दि. २७ मे २०१७ रोजी व वाशिम उपविभाग स्तरावर समाधान शिबीर आयोजित करण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे