आरोग्य विभागाच्या चित्ररथचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते उदघाटन
वाशिम, दि. १३ : उष्माघातापासून बचावासाठी जनजागृती करण्याकरिता वाशिम जिल्हा परिषदेच्या
आरोग्य विभागाने तयार केलेल्या चित्ररथाचे उदघाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्या
हस्ते आज करण्यात आले. उष्माघातापासून नागरिकांचे संरक्षण होण्यासाठी आरोग्य विभागाने
तयार केलेल्या चित्ररथाचे पालकमंत्र्यांनी यावेळी कौतुक केले.
याप्रसंगी खासदार भावना गवळी, जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे
सभापती विश्वनाथ सानप, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. बी. पटेल, जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. व्ही. मेहकरकर आदी
उपस्थित होते.
आरोग्य विभागाने तयार केलेल्या चित्ररथाद्वारे उष्माघाताची
कारणे, उष्माघात होण्याची लक्षणे, उष्माघातावर प्रतिबंधक उपाय व उष्माघातावर उपचार
याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच चित्ररथासोबत उष्माघातापासून
बचावासाठी काय करावे, काय करू नये याविषयीची माहिती देणाऱ्या पत्रकाचे वाटपही करण्यात
येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सेलोकर यांनी यावेळी सांगितले.
Comments
Post a Comment