शौचालय बांधकामासाठी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे श्रमदान
वाशिम,
दि. १५ : राज्याच्या
पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज मंगरूळपीर
तालुक्यातील पेडगाव व शेलूबाजार येथे स्वतः शौचालय बांधकाम करून नागरिकांना शौचालय
उभारणी करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत
तुपकर व आमदार राजेंद्र पाटणी, मंगरूळपीर पंचायत समितीच्या सभापती नीलिमा देशमुख,
जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, ग्रामीण पाणी पुरवठा
विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश राठोड आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
ना. खोत यांनी सर्वप्रथम पेडगाव येथील
लीलाबाई सातपुते यांच्या घरी सुरु असलेल्या दोन शोषखड्ड्यांच्या शौचालय बांधकामाला
भेट दिली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पाटील यांनी या दोन
शोषखड्ड्याच्या शौचालयाचे फायदे सांगितले. तसेच हे शौचालय केवळ १० हजार
रुपयांमध्ये उभारणे शक्य असल्याने सर्वसामान्य नागरिकांना फायदेशीर असल्याचे
त्यांनी सांगितले. यावेळी ना. खोत यांनी स्वतः श्रमदान करून शौचालय उभारणीस हातभार
लावला. वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, आमदार राजेंद्र पाटणी यांनीही
त्यांना याकामी मदत केली. यावेळी उपस्थित नागरीकांशीही ना. खोत यांनी संवाद साधला.
तसेच ज्यांच्याकडे अद्याप शौचालय नाही, त्यांनी लवकरात लवकर शौचालयाची उभारणी
करावी व त्याचा वापर सुरु करण्याचे आवाहन केले. स्वच्छता ही अतिशय महत्वाची असून
त्यासाठी प्रत्येकाच्या घरामध्ये शौचालय असले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
शेलूबाजार येथील महादेव चंदनशिव
यांच्या घरी भेट देऊन तेथेही ना. खोत व इतर मान्यवरांनी शौचालय बांधकामामध्ये
श्रमदान केले व गावातील इतर नागरिकांनीही शौचालयाची उभारणी करून गाव हागणदारीमुक्त
करण्याचे आवाहन केले. यावेळी शेलूबाजारच्या सरपंच सुनिता कोठाळे उपस्थित होत्या. शेलूबाजार
ग्रामपंचायतीमध्ये आयोजित कार्यक्रमात ना. खोत यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. ते
म्हणाले, राज्यातील प्रत्येक गाव लवकरात लवकर हागणदारीमुक्त झाले पाहिजे, हे
शासनाचे उद्दिष्ट आहे. शेलूबाजार येथील ग्रामस्थांनी आपले गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी
पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी लोककलावंत विलास भालेराव,
सुशिला घुगे, केशव डाखोरे, कविनंद गायवाड यांनी नागरिकांना लोकगीतातून स्वच्छतेचा संदेश दिला.
Comments
Post a Comment