डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करा - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी



·        सामाजिक समता सप्ताहाचा समारोप
वाशिमदि१४ :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय बुद्धिमान व्यक्तिमत्व होते. त्यांनी अतिशय कमी कालावधीत विविध शास्त्रांच्या पदव्या संपादन केल्या. कठीण परिस्थितीमध्येही त्यांनी जिद्दीने आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास आजच्या पिढीला प्रेरणा देणारा आहे. त्यामुळे युवा वर्गाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचा अभ्यास करून त्यांचे विचार आत्मसात करावेत, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजित या कार्यक्रमास समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त माया केदार, सामाजिक कार्यकर्ते अनंतकुमार जुमडे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस अर्थात १४ एप्रिल हा दिवस ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य शासने घेतला आहे. समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी मिळावी, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीचा समान विकास होण्यास मदत होईल, अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती. त्यांच्या या विचारांना अनुसरूनच शासन व प्रशासन समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासाठी कटीबद्ध राहून प्रयत्न करीत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक संकटांचा सामना करीत विविध शास्त्रांचे ज्ञान संपादन केले. त्यांची प्रेरणा घेऊन आजच्या युवा पिढीने ज्ञानार्जन करून आपली प्रगती साधण्याची गरज आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द असणे आवश्यक असते, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिले आहे. त्यांचा आदर्श घेऊन युवकांनी आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी श्री. जुमडे यांनीही आपले विचार व्यक्त केले.
सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षि शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती केदार यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन श्रीमती शीतल उजाडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. यु. एस. जमदाडे यांनी केले. यावेळी श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय व श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे