सिंचनाच्या विविध उपाययोजनांमुळे राज्यातील कृषी विकास दर १२ टक्के - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस






·        शेतकऱ्यांच्या उत्पन्नात यावर्षी ४० हजार कोटींची वाढ
·        कारंजा, मानोरा तालुक्यासाठी ३ हजार विहिरींचा प्रस्ताव पाठवा
·        पोहरादेवी विकास आराखड्यासाठी निधी कमी पडू देणार नाही
·       पोहरादेवी विकास आराखड्यातून बंजारा समाजाचे दर्शन घडणार
वाशिम, दि. २ : राज्य शासनाने गेल्या दोन वर्षात राबविलेले जलयुक्त शिवार अभियान व सिंचन विहिरीसारख्या उपाययोजनांमुळे शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून उणे असलेला कृषी विकासदर यंदा १२ टक्के झाला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी (जि. वाशिम) येथे आयोजित विश्वशांती लक्षचंडी महायज्ञाला भेट देण्यासाठी मुख्यमंत्री आज पोहरादेवी येथे आले होते.
याप्रसंगी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार मनोहर नाईक, आमदार हरिभाऊ राठोड, पोहरादेवी संस्थानचे प्रमुख रामराव महाराज, माजी आमदार अनंतराव पाटील, अमरावती परिक्षेत्राचे पोलीस विशेष महानिरीक्षक विठ्ठल जाधव, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रामराव महाराज यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्री म्हणाले की, शासनाने गेल्या दोन वर्षामध्ये शेतकऱ्यांना सिंचन सुविधा पुरविण्यावर विशेष भर दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात ४० हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. कृषी पंपांच्या प्रलंबित वीज जोडण्या तातडीने देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. आगामी काळात कृषी पंपासाठी मागेल त्याला तातडीने वीज उपलब्ध करून देण्यात येईल. वाशिम जिल्ह्यातही जलयुक्त शिवार अभियान व सिंचन विहिरींचे काम सुरु आहे. कारंजा, मानोरा तालुक्यासाठी येत्या काळात ३ हजार सिंचन विहिरी देण्यात येतील, त्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
देशभरातील बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र पोहरादेवीचा विकास करण्यासाठी ७३ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. या विकास आराखड्याच्या माध्यमातून बंजारा समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. विकास आराखड्याची कामे विहित कालावधीत पूर्ण करण्यात येतील. या कामासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. बंजारा समाजाच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. या समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची सुरुवात बंजारा भाषेत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाच्या सुरुवातीला पोहरादेवी येथे जमलेल्या बंजारा समाज बांधवांना त्यांच्या बोली भाषेतून साद घातली. गेल्या दोन वर्षांपासून पोहरादेवी येथील यात्रेला येण्याची इच्छा होती, आज ही इच्छा पूर्ण झाल्याने आनंद झाल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी बंजारा भाषेतून व्यक्त करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.
पोहरादेवी हे कष्टकऱ्यांचे श्रद्धास्थान : ना. पंकजा मुंडे
देशातील कष्टकरी व श्रमिक जनतेचे श्रद्धास्थान आहे. माझे वडील स्व. गोपीनाथराव मुंडे यांचेही हे श्रद्धास्थान असल्याने त्यांची परंपरा कायम ठेवणार असून यापुढेही प्रत्येकवर्षी आपण पोहरादेवी येथे येणार असल्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. बंजारा आणि वंजारी यांचे सांस्कृतिक ऋणानुबंध प्राचीन असल्याचे सांगून त्यांच्या विकासासाठी आम्ही शासन म्हणून कटीबद्ध आहोत. गेल्या दोन वर्षांमध्ये शासनाने जो विकास केला, तो यापूर्वी कधीच झाला नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. पोहरादेवी ही बंजारा समाजाची काशी आहे. अशा या पवित्र धार्मिकस्थळी जो यज्ञ सुरु आहे, त्या यज्ञामध्ये आपले अहंकार, व्यसन आणि भ्रष्टाचार याची आहुती देण्याचे आवाहन ना. मुंडे यांनी केले.
मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने पोहरादेवीच्या विकासाला गती : पालकमंत्री संजय राठोड
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने पोहरादेवी विकास आराखडा मंजूर झाला आहे. त्यांच्या मार्गदर्शन आराखड्याचे काम सुरु आहे. आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांना पोहरादेवी येथे येऊन फक्त घोषणा केल्या. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोहरादेवीवरील श्रद्धा कृतीतून सिद्ध केल्याचे प्रतिपादन वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. पोहरादेवी येथे वन विभागाने वन उद्यान उभारण्यास सुरुवात केली असून ती देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी आकर्षण असेल. उमरी सिंचन प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. याबाबत लवकरच तोडगा निघेल. बंजारा समाजाच्या विविध प्रश्नांची सोडवणूक मुख्यमंत्र्यांनी केली आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यात बंजारा समाजाच्या आरक्षणाबाबत योग्य तो निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुध्दा बंजारा समाजाच्या योग्य आरक्षणासाठी सकारात्मक भूमिका घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
            कारंजा-मानोराचे आमदार राजेंद्र पाटणी यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. अकोला-मंगरूळपीर-पोहरादेवी-दिग्रस हा मार्ग राष्ट्रीय महामार्गाला जोडण्याचे काम केंद्र शासनाने केले आहे. तसेच रेल्वे मार्गासाठी १३०० कोटी दिल्याने पोहरादेवी येथे देशभरातून येणाऱ्या भक्तांना अधिक सोयीस्कर होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी पोहरादेवी व मतदारसंघाच्या विकासासाठी वेळोवेळी मदत केल्यान या परिसरात विकासाचे नवीन चित्र निर्माण होईल असे सांगून आ. पाटणी यांनी मुख्यमंत्र्याचे आभार मानले.
मुख्यमंत्र्यांनी दिली विश्वशांती लक्षचंडी महायज्ञाला भेट

विश्वशांतीसाठी अखिल भारतीय बंजारा शक्तीपिठाच्यावतीने दि. २४ मार्च पासून लक्षचंडी महायज्ञ सुरु करण्यात आला आहे. या महायज्ञाची सांगता दि. ३ एप्रिलरोजी होणार आहे. या यज्ञास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोहरादेवी येथील जगदंबा माता व संत सेवालाल महाराज समाधीचे दर्शन घेतले. जगदंबा माता मंदिर येथे कबीरदास महाराज यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे