जिल्हाधिकारी कार्यालयातील डिजीधन मेळाव्यात ‘भीम’ अॅप विषयी मार्गदर्शन
वाशिम, दि. १४ : जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या डिजीधन मेळाव्यामध्ये ‘भीम’ अॅपच्या वापराविषयी तसेच रोखरहित व्यवहाराच्या इतर पर्यायांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
रोखरहित व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने ‘भीम’ अॅपची निर्मिती केली आहे. सर्वसामान्य नागरिकालाही अतिशय सहजपणे हे अॅप वापरता येते, हे या अॅपचे वैशिष्ट्ये आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या अॅपचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात सुरु करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यावेळी केले.
स्टेट बँक ऑफ इंडियाचे अभिषेक काळे यांनी यावेळी उपस्थितांना पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशनच्या सहाय्याने ‘भीम’ अॅप व स्टेट बँकेच्या इतर अॅपविषयी माहिती दिली. यामध्ये त्यांनी ‘भीम’ अॅप कशाप्रकारे डाऊनलोड करावे, त्याचे रजिस्ट्रेशन, पैशांची देवाण-घेवाण आदी बाबींविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच या अॅपचा वापर केल्यामुळे होणारे फायदे व सुरक्षितता समजून सांगितले.
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी)चे सहाय्यक आशिष राऊत यांनी यावेळी रोखरहित व्यवहाराचे पर्याय व त्याच्या वापराबाबत माहिती दिली. यामध्ये त्यांनी आधार सक्षम पेमेंट सिस्टीम (एईपीएस), युनिफाईड पेमेंट इंटरफेस (युपीआय), अविस्तृत पूरक सेवा (युएसएसडी), मोबाईल बँकिंग, पीओएस मशीन, बँकांमार्फत देण्यात येणारी विविध कार्ड्स आदी माध्यमांचा वापर कसा करावा. तसेच ही माध्यमे वापरताना कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच यासंबंधीत चित्रफित दाखविली.
वाशिम शहरातील एसएमसी इंग्लिश स्कूल ही शाळाची प्रवेशप्रक्रिया पूर्णतः रोखरहित केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. हरिभाऊ क्षीरसागर यांचा यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी प्रा. क्षीरसागर यांनी शाळेच्या रोखरहित प्रवेश प्रक्रियेविषयी उपस्थितांना माहिती दिली.
प्रधानमंत्री यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण
देशभरात सुरु असलेल्या डिजीधन मेळाव्याचा समारोप नागपूर येथील मानकापूर क्रीडा संकुलामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाला. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात स्क्रीनच्या सहाय्याने दाखविण्यात आला.
Comments
Post a Comment